शिवस्मारकासाठी पैसे येणार कुठून?

By admin | Published: December 27, 2016 01:09 AM2016-12-27T01:09:20+5:302016-12-27T01:09:20+5:30

भाजपा सरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जाते आणि आकडे फुगवून सांगत जनतेची दिशाभूल करण्यातच ते धन्यता मानतात. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना

From where will the money for Shivsmara come? | शिवस्मारकासाठी पैसे येणार कुठून?

शिवस्मारकासाठी पैसे येणार कुठून?

Next

नाशिक : भाजपा सरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जाते आणि आकडे फुगवून सांगत जनतेची दिशाभूल करण्यातच ते धन्यता मानतात. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये कोठून आणणार? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला.
शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यावर सोमवारी आले. ते म्हणाले, ‘भाजपाचे सरकार काँग्रेसवाल्यांचाच कित्ता गिरवत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आखत, त्यांनी त्याचे एक उदाहरण दिले आहे.’
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी साडेतीन हजार कोटी आणणार कोठून? जनतेपुढे फुगवलेले आकडे मांडणे, या सरकारला चांगले जमते. आकड्यांचा ‘खेळ’ करणे सोपे जरी असले, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा या सरकारची भूमिका बदललेली असते.
लोकांची स्मरणशक्ती कमी आहे, असे गृहीत धरून भाजपा सरकार घोषणा करत आले आहे. मात्र, लोकांच्या सर्व घोषणा लक्षात असून, त्यापैकी किती घोषणा खऱ्या ठरल्या, त्याचे ‘गणित’ही जनतेने जुळवून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुकणे धरणातून साडेसोळा किलोमीटरची जलवाहिनी, तसेच जॅकवेलचे सुमारे १२० कोटींचे महापालिकेचे ठळक काम प्रगतिपथावर असून, लवकरच हा प्रकल्प नाशिककरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना पुढील किमान २५ वर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

महाराजांचा ‘ठेवा’ सुरक्षित ठेवा
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांच्या शौर्याची साक्ष देणारे अनेक दुर्ग, किल्ले राज्यात उभे आहेत. मात्र, काळानुरूप त्यांची दुरवस्था झाली असून, महाराजांचा हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित करण्याऐवजी भाजपा सरकार केवळ पुतळे उभारून काय साध्य करणार आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

भाष्य नाही : मनसेचे नाशिकला एकूण ४० नगरसेवक होते. त्यापैकी केवळ १४ नगरसेवक आता पक्षात आहेत. नगरसेवक पक्ष सोडून जात असल्याबद्दल ठाकरे यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

Web Title: From where will the money for Shivsmara come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.