नव्या रिक्षा उभ्या राहणार कुठे?
By Admin | Published: July 12, 2017 03:45 AM2017-07-12T03:45:56+5:302017-07-12T03:45:56+5:30
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे. त्यामुळे आधी आहेत तीच वाहने उभी राहण्यासाठी व्यवस्था करा, त्यानंतर नवीन रिक्षांसाठी सुसज्ज स्टॅण्ड देऊन त्या रस्त्यावर आणा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केली.
‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मधील ‘नव्या साडेपाच हजार रिक्षांचा जाम’ या वृत्ताची दखल घेत चौधरी यांनी यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीतील शहरांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असताना शहरात नवीन रिक्षा आल्यास कोंडीत आणखी भर पडेल. नव्या वाहनांना शहरात प्रवेश नाही, असे शिवसेनेचे धोरण नाही. पण आहे त्या वाहनांबाबत ठोस भूमिका घ्यावी. डोंबिवलीत नेमके रिक्षा स्टॅण्ड किती, त्यांची क्षमता किती, नव्याने येणाऱ्या रिक्षा उभ्या कुठे करणार, याचा विचार संबंधित यंत्रणेने करावा. तो नागरिकांसमोर मांडावा आणि त्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मगच निर्णय घ्यावा. त्यासंदर्भात आरटीओ अधिकारी, शहर वाहतूक शाखा, सामाजिक संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांचे हित महत्त्वाचे असली तरी आगोदर शहरात वाहनांची कोंडी होत आहेत. त्यात नव्याने डोंबिवलीच्या वाट्याला दोन हजार रिक्षा येणार, त्या उभ्या कुठे राहणार, त्यांना स्टॅण्ड कुठे मिळणार, याचा विचार का केला जात नाही, असा सवाल भाजपप्रणित रिक्षा युनियनचे सचिव दत्ता माळेकर यांनी केला.
>पत्र देणे हा विरोधाभास : राजेश कदम
नवीन रिक्षांचे परवाने परिवहन मंत्र्यांनीच खुले केले आहेत. त्यामुळे चौधरी पत्र देऊन काय करणार? पत्र देणे हा विरोधाभास आहे. डोंबिवलीत आधीच जागा नाही. एवढ्या रिक्षा काय करायच्या आहेत. जागा दाखवा आणि परवाना द्या. इमारत बांधतांना पार्किंग द्यावे लागते तर मग नवी वाहने कुठे उभी राहणार? त्यासाठी आधी जागा दाखवा आणि मग परवाने घ्या, असे बंधन का नाही?, परिवहन मंत्र्यांनी यात लक्ष घालावे. तसेच परवाने देताना मराठी माणसांना आधी द्या, असे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केले आहे.