...तर कनिष्ठ महाविद्यालये भरमसाट शुल्क आकारतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:26 AM2018-06-15T06:26:06+5:302018-06-15T06:26:06+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्काची निश्चिती नाही.
मुंबई - अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात झाली असली तरी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्काची निश्चिती नाही. परिणामी, प्रवेशावेळी शुल्क किती भरायचे, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांपुढे उभा राहील आणि कनिष्ठ महाविद्यालये भरमासाट शुल्क आकारातील, अशी भीती सिस्कॉम या संस्थेने व्यक्त केली आहे.
अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना स्वत:च्या शाळेसाठी शुल्क निश्चिती करण्याचे अधिकार नसून शासनाने निर्धारित केलेले शुल्क घेण्याचे निर्देश शाळा संहितेत आहेत. तरीही बहुतेक अनुदानित शैक्षणिक संस्था शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा कित्येक पट अधिक शुल्क आॅनलाइन प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत नोंदवत असल्याचे दिसून आले आहे. यावरून शिक्षण उपसंचालकांनी कोणतीही पाहणी, आक्षेप न घेता एकप्रकारे मान्यता दिल्याचे सिद्ध होते, असा दावा सिस्कॉमच्या संचालिका वैशाली बाफना यांनी केला आहे.
अकरावीच्या माहिती पुस्तिकेत दरवर्षी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क प्रसिद्ध केले जाते. यंदा माहिती पुस्तिकेत गेल्या वर्षीचे शुल्क दिलेले नाही आणि गेल्या वर्षीच्या माहिती पुस्तिकाही नवीन विद्यार्थ्यांकडे नाहीत. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालये मनमानी शुल्क आकारतील, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.