"जिथे पाऊस, तिथे पोलीस भरती पुढे ढकलली", गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 02:28 PM2024-06-21T14:28:02+5:302024-06-21T14:28:28+5:30
Devendra Fadnavis : मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल १७ हजार ४७१ पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला १९ जूनपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या पोलीस भरती प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका पोलीस भरतीला बसताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलीस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एका प्रकल्पाचे प्रेझेंटेशन करण्यात आले. ज्यामध्ये एक कंपनी सरकारची तयार केली आहे. जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हा झाल्यास तो सोडवणे या करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते त्याच सादरीकरण आज झाले. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो. काही महिने लागतात, ते काही मिनिटांत शोधता येईल. वाहतूक नियोजनात फायदा होईल. या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल. आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलीस दल आपलं असेल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.