धनंजय महाडिक पक्षात राहणार की नाही
By admin | Published: February 28, 2017 01:05 AM2017-02-28T01:05:56+5:302017-02-28T01:05:56+5:30
निर्णय घ्या; हसन मुश्रीफ यांचे आव्हान; भाजप उमेदवारांचा प्रचार करणे दुर्दैवी
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिका, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केला त्यावेळी डोळेझाक केली; पण जिल्हा परिषद निवडणुकीत तर त्यांनी थेट भाजपचाच प्रचार केला. त्यामुळे त्यांना खरोखरच पक्षात राहायचे आहे की नाही हे त्यांनी एकदा स्पष्टच करावे, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांना दिले.
राष्ट्रवादीच्या नूतन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोमवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी महाडिक यांच्याबद्दल रोखठोक भूमिका मांडली.
देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून धनंजय महाडिक यांना निवडून आणले. त्यानंतर सातत्याने पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात प्रचार केला. त्यावेळी डोळेझाक केली. जिल्हा परिषदेला ‘उत्तूर’वगळता एकाही ठिकाणी त्यांनी सभा घेतली नाही. उलट काही ठिकाणी भाजपचा छुपा प्रचार केला, हे दुर्दैवी आहे. यदाकदाचित लोकसभेला पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कसे राबायचे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ता उतरतो, त्यावेळी त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतो. अशावेळी दगाफटका झाला तर काळजाचे तुकडे तुकडे होतात. गेली तीन वर्षे बघतोय, आता वेळ आली आहे, त्यांनी पक्षात राहायचे की नाही याचा निर्णय घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, अनिल साळोखे उपस्थित होते.
शेट्टी-खोत वादाने वेदना
राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळाला; पण सत्तेसाठी दोघांमध्ये भांडणे होणे हे चळवळीच्या दृष्टीने मारक आहे. शेट्टी यांचा घराणेशाहीचा विरोध बरोबर आहे. खोत यांनी मनावर घेणे योग्य नसून, शेतकरी म्हणून दोघांतील वादाने मनाला वेदना होत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
‘युवक क्रांती’शी चर्चा नाही
चंदगडची युवक क्रांती आपल्याबरोबर राहणार का? यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, त्यांच्याशी अद्याप आपले बोलणे झालेले नाही.
तक्रार केली असती तर.....
धनंजय महाडिक यांच्याबद्दल अद्याप पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केलेल्या नाहीत. तक्रारी केल्या असत्या तर पवारसाहेब त्यांच्या कार्यक्रमाला आलेच नसते, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली.
समरजितराजेंचे कौतुक
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल माहिती असतानाही समरजितसिंह घाटगेंनी आक्रमकपणे प्रचारयंत्रणा राबविली. त्यांचा शेवटपर्यंतचा उत्साह वाखाणण्यासारखा होता, असेही मुश्रीफ म्हणाले.
शेट्टी-खोत वादाने वेदना
राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांना चार पैसे जादा दर मिळाला; पण सत्तेसाठी दोघांमध्ये भांडणे होणे हे चळवळीच्या दृष्टीने मारक आहे. शेट्टी यांचा घराणेशाहीचा विरोध बरोबर आहे. खोत यांनी मनावर घेणे योग्य नसून, शेतकरी म्हणून दोघांतील वादाने मनाला वेदना होत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.