जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 08:24 AM2024-10-17T08:24:09+5:302024-10-17T08:24:37+5:30
२०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत राज्यात आतापर्यंत ६९ लाख २३ हजार १९९ इतके मतदार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले...
मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी २०० पेक्षा जास्त शासन निर्णय (जीआर) जारी केले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जर यातील कोणता शासन निर्णय जारी झाला असेल, तर त्याची तपासणी करण्यात येईल, तसेच महायुतीच्या नेत्यांकडून भाषणात वापरण्यात येत असलेल्या ‘व्होट जिहाद’ या शब्दालाही तपासण्यात येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. २०१९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत राज्यात आतापर्यंत ६९ लाख २३ हजार १९९ इतके मतदार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने आमदार निधी वाटपासह इतर अनेक प्रशासकीय निर्णयांचे शासन आदेश मंगळवारी जारी केले. यातील कोणते जीआर कोणत्या वेळी जाहीर करण्यात आले, हे तपासून पाहू. तसेच, महायुतीच्या नेत्यांकडून ‘व्होट जिहाद’ हा शब्द भाषणात वापरण्यात येतो. यात धार्मिक प्रचार होत असल्याचा आरोप होतो. त्याबाबतही तपासून पाहू, आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा शब्द वापरण्यात आला आहे का, हे तपासू असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
पिपाणी चिन्ह कायम
- पिपाणी आणि तुतारी या चिन्हाबद्दल केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आधीच स्पष्ट केले आहे.
- ही चिन्हे मतदान यंत्रावर बाजूबाजूला येतील का, हे आताच सांगता येत नाही. उमेदवारांच्या नावांच्या वर्णमालाक्रमानुसार ते ठरते, असे चोक्कलिंगम यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
१९ ऑक्टोबर पर्यंत करता येईल मतदार नावनोंदणी
अद्यापपर्यंत मतदार नोंदणी न केलेल्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीसाठी अर्ज करता येईल, असेही चोक्कलिंगम यांनी यावेळी जाहीर केले.