आमदार फोडायचे की मध्यावधी निवडणूक?
By admin | Published: March 24, 2017 02:00 AM2017-03-24T02:00:54+5:302017-03-24T02:00:54+5:30
राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे,
मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे, अशा दोन पर्यायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा सल्ला घेण्याचा निर्णय भाजपाच्या विस्तारित कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य व काही मंत्री हे पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर झालेल्या या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय करायचे यावर जशी बैठकीत चर्चा झाली तशीच शिवसेनेची साथ सोडून इतर पर्यायांवर आपणच निर्णय घेतला पाहिजे, असा बहुतेकांचा सूर होता.
भाजपा मध्यावधी निवडणुकीला सामोरी गेली तर आपल्याला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे मत एका ज्येष्ठ मंत्र्याने व्यक्त केले. सरकारबाबत अनिश्चिततेची अवस्था एकदाची संपवा, त्यासाठी एक तर मध्यावधीला सामोरे जाऊयात किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपात आणून पुन्हा निवडून आणू, असाही सूर होता. पोटनिवडणुकीत एक-दोन जण निवडून आले नाहीत तर त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा पर्यायदेखील खुला असेल. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचे ११ आणि राष्ट्रवादीचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यातील किमान १४ जण असे आहेत की जे भाजपाच्या उमेदवारांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून निवडून आलेले होते. त्यामुळे ते भाजपाकडून पोटनिवडणुकीत लढले तर निश्चितपणे जिंकू शकतात. भाजपा आणि मित्रपक्षांचे मिळून सध्या १३४ सदस्य असल्याचा पक्षाचा दावा आहे. याचा अर्थ २८८ सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेशिवाय बहुमतासाठी भाजपाला आणखी अकराच आमदार हवे आहेत. अशा वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांना निवडून आणायचे तर त्याबाबतचा निर्णय भाजपाला घ्यावा लागणार आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी वा पोटनिवडणूक यापैकी कोणत्याही एका बाजूने आजच्या बैठकीत मत नोंदविले नाही. हा विषय तत्काळ निर्णय घेण्यासारखा नाही. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे मत काय, मध्यावधीला सामोरे गेल्यास काय होऊ शकेल या सगळ्या बाजू तपासून पुढे जावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)