सत्याची बूज राखणार की नाही?

By Admin | Published: August 10, 2016 01:45 AM2016-08-10T01:45:37+5:302016-08-10T01:45:37+5:30

होय, मी येडी बाभळच आहे, जी टाकाऊ आणि खडबडीत, जाळण्याच्याच लायकीची आहे; पण तिचा काटा कुणाला कुठे रुतला सांगता येत नाही.

Whether the truth will be maintained or not? | सत्याची बूज राखणार की नाही?

सत्याची बूज राखणार की नाही?

googlenewsNext

पुणे : होय, मी येडी बाभळच आहे, जी टाकाऊ आणि खडबडीत, जाळण्याच्याच लायकीची आहे; पण तिचा काटा कुणाला कुठे रुतला सांगता येत नाही. शब्दबंबाळ लेखक जर माझ्या काट्याने रक्तबंबाळ झाले तर त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असा टोला वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांना लगावत ‘सत्तेचे बूट चाखताना सत्याची बूज राखणार का नाही’ अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पलटवार केला.
१८व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचा सत्कार मंगळवारी महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे आणि बंधुता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेंद्र भारती, उद्धव कानडे, शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते. रामदास फुटाणे यांनी दोन दिवसांपूर्वी नामोल्लेख न करता संमेलनाध्यक्षांना उद्देशून ‘सरस्वतीच्या मंदिरात मोरांनी रात्र रात्र जागवली, तरीसुद्धा पिंपरी, चिंच आणि वडाखाली वेडी बाभळ उगवली’ अशी विडंबनात्मक कविता सादर केली होती. त्याचा सबनीसांनी खरपूस समाचार घेतला. अभिव्यक्तीच्या नावाखाली सूज हेच सौष्ठव म्हणून जपणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्षेप का घ्यावा, असा सवालही उपस्थित केला.उद्या माझ्यासारखाच रोकडे कोण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर मध्यमवर्गीय उपटसुंभ असा प्रश्न उपस्थित करू शकत असतील तर ज्यांना खुमखुमी आहे त्यांनी माझ्याशी येऊन चर्चा करावी. रोकडे यांनी कार्यकर्ता म्हणून जी भूमिका स्वीकारली आहे, त्या भूमिकेत आणि ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मी स्वीकारलेल्या भूमिकेत तिळमात्रही फरक नाही. आपण पूर्वाध्यक्षांचा कोणताही अवमान केलेला नाही; उलट वास्तवावरच बोट ठेवले, असेही त्यांनी सूचित केले. सत्काराला उत्तर देताना प्रकाश रोकडे म्हणाले की, मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीसाठी साहित्यिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारी साहित्यनिर्मिती आवश्यक आहे. साहित्यिकच समाजाला निरोगी करण्याचे काम करू शकतो.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Whether the truth will be maintained or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.