कोणत्या कला उपासकाला सलाम?
By admin | Published: March 26, 2016 12:32 AM2016-03-26T00:32:19+5:302016-03-26T00:32:19+5:30
शिल्पकला, चित्रकला, छायाचित्रकला आणि कलादिग्दर्शन अशा कलांचे आपण सारे पुजारी. या कला आपले आयुष्य समृद्ध करतात. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कारासाठीच्या
चला, निवड करू या...
मुंबई : शिल्पकला, चित्रकला, छायाचित्रकला आणि कलादिग्दर्शन अशा कलांचे आपण सारे पुजारी. या कला आपले आयुष्य समृद्ध करतात. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कारासाठीच्या नामांकनांमध्ये यंदा किशोर ठाकूर, नानासाहेब येवले, नरेंद्र राहुरीकर, शशिकांत धोत्रे आणि विवेक रानडे या कलाकारांचा समावेश आहे. ज्युरी आणि लोकमतच्या वाचकांनीच त्यातील एक भाग्यवंत ठरवायचा आहे.
१) किशोर ठाकूर,
रत्नागिरी, रायगड (शिल्पकार)
निर्मिती, सर्जनशीलता म्हणजे बाह्य विश्व व अंतर्गत विश्व अर्थात, आपली चेतना किंवा जाणीव यांचा संगम आहे, असे समजणारे शिल्पकार म्हणून किशोर ठाकूर यांची ओळख आहे. निर्मितीच्या उगमस्थानाचा स्रोत शोधणे हे कष्टाचे, महत्प्रयासाचे काम आहे. कारण नवनिर्मितीमागील विचाराचे संश्लेषण (समन्वय) करणे, हे त्याच्यासारख्याच विचारांची मीमांसा (पृथक्करण) करण्यापेक्षाही अवघड आहे, असे किशोर ठाकूर मानतात. त्यांच्या कलाकृती या रसिकांना कलेविषयीचा दृष्टिकोन समजून घेण्यास साहाय्यकारी ठरतात. त्यांच्या कलाकृतींचे विषय नैतिकतेच्या बदलत्या परिसीमांबाबत खोचक, मर्मभेदक भाष्य करतात आणि जीवनातील बदलते परिप्रेक्ष नियंत्रित करणारी उत्कटता अर्थात, नैतिक भावविरेचन अधोरेखित करतात. स्वत:च्याच विचारांच्या बेड्यांमध्ये अकडलेल्या त्यांच्या झपाटलेपणावर ठाकूर यांनी कालांतराने मात केली. ते निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आनंद घेऊ लागले.
२) नानासाहेब येवले,
पेंटिंग्ज, मुंबई
औरंगाबादमध्ये जन्मलेल्या आणि कोपरगावमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम करणाऱ्या नानासाहेब येवले यांच्या हातात जादूच आहे. वॉटर कलरचा कागदांवर वापर करून नानासाहेबांनी काढलेली बोलकी चित्रे पाहणे ही मेजवानीच. हाताची जादू आणि वॉटर कलर्सचा वापर करण्याची खुबी, यामुळे त्यांना बक्षिसे मिळू लागली. औरंगाबादच्या चित्रकला महाविद्यालयातून पदविका, सरकारी महाविद्यालयातून ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये पदवी मग मुंबईत जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समधून आणखी एक पदविका आणि पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बॉम्बे आर्ट सोसायटी, जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सपासून अनेक संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मुंबईतील जवळपास सर्व महत्त्वाच्या आर्ट गॅलेऱ्यांमध्ये त्यांच्या वॉटर्स कलर्स चित्रांची प्रदर्शने भरली आणि त्यांना रसिकांची उत्तम दादही मिळाली.
३) नरेंद्र राहुरीकर,
मुंबई (आर्ट डायरेक्टर)
‘एअरलाइन्स’ या हिंदी मालिकेसाठी संपूर्ण विमान आणि विमानतळ यांची खरीखुरी प्रतिकृती उभारणे असो, की ब्लूसारख्या सिनेमात पाण्याच्या आत सेट उभे करणे असो, हे सारे करून दाखवण्याचे काम नरेंद्र राहुरीकर यांचे आहे. ‘दिलवाले’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’, ‘बोल बच्चन’ यांसारख्या असंख्य चित्रपटांच्या पडद्यावर कलादिग्दर्शक म्हणून त्यांचेच नाव आहे. ‘लक’मधील पॅराशूट, प्लेन आणि ट्रेन असा आकाश व जमीन एकाच वेळी दाखवणारा सेट त्यांचा होता. फाइन आर्टमध्ये पदवी घेतल्यानंतर ते मुंबईत आले. समीर चंदा यांच्यासोबत कामाला त्यांनी सुरुवात केली. पण अल्पावधीत तेच ख्यातनाम कला दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी श्याम बेनेगल, महेश भट्ट, राजकुमार संतोषी, रोहित शेट्टी, संगीत शिवन, रामगोपाल वर्मा या दिग्दर्शकांसह टायटल व कला दिग्दर्शनाचे, प्रोडक्शन डिझाइनचे काम करताना डिफाइन आर्ट्स या कंपनी आणि स्टुडिओची स्थापना केली. त्यांच्या मालिकांची संख्या २५हून अधिक तर चित्रपटांची संख्याही ५० आहे. त्यांनी १००हून अधिक अॅड फिल्म्स केल्या आहेत.
४) शशिकांत धोत्रे,
पेन्सील स्केच, सोलापूर
ग्रामीण भागाचे जीवन कुंचल्यातून उतरवताना, वीज नसल्याने खिडक्या, दरवाजातून आत शिरणारा वा कंदिलातून येणारा अर्धवट उजेड आणि निम्मा अंधार यामध्ये दिसणारे चेहरे, परकर-पोलके घातलेली मुलगी वा नऊवारी साडी नेसलेली महिला, खिडकीत उभी पाचवारी साडीतील बाई हे सारं कॅनव्हासवर रंगीत पेन्सीलने जिवंतपणे उतरवणं ही किमया शशिकांत धोत्रे यांची. त्यांच्या चित्रांचा पोत नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. पेन्सीलनी काढलेल्या चित्रांना अनेकदा मर्यादा येतात, पण शशिकांत धोत्रे यांची चित्रे पाहताना त्या कधीच दिसत वा जाणवत नाहीत. शशिकांत धोत्रे यांच्याकडे चित्रकलेचा वारसा नसला, तरी तो त्यांनी प्रयत्नांनी आत्मसात केला. त्यांनी जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समधून आणि नंतर पुण्याच्या फिल्म अॅण्ड टीव्ही इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले. त्यांना बॉम्बे आर्ट्स सोसायटी, इंडियन आर्ट्स फेस्टिवल, तसेच महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन यांचे पुरस्कार मिळाले आहेत.
५) विवेक रानडे,
फोटोग्राफी व डिझायनिंग, नागपूर
महाराष्ट्रातील मोजक्या छायाचित्रकारांमधील आघाडीचे नाव म्हणजे विवेक रानडे. कॅमेऱ्याचाच कुंचला बनवण्याची ताकद विवेक रानडे यांच्यात आहे. ते माणसाच्या आयुष्यातून हरवलेल्या आणि नव्याने आलेल्या वस्तूंची सांगड कॅमेऱ्याने मानवी भावभावनांशी जोडून दाखवतात! कलेचा साधक. मूळ नागपूरचे, तरीही त्यांनी मुंबईच्या जाहिरातविश्वात ठसा उमटवला. ते वास्तविक ग्राफिक आर्टिस्ट आणि इलस्टे्रटर. पण हातात कॅमेरा आला आणि त्यांच्या कलाविष्काराचे माध्यमच बदलले. पुस्तकांच्या मुखपृष्ठे कंपन्यांची कॉर्पोरेट आयडेंटिटी ते प्रॉडक्ट डिझाइनपर्यंत त्यांनी हे माध्यम वेगवेगळ्या प्रकाराने
व कलात्मकतेने वापरले आहे. मुंबईतली नोकरी सोडून ते स्वतंत्र काम सुरू करण्यासाठी नागपूरला परतले आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि देश-विदेशातल्या असाइन्मेंट्स मिळाल्या आहेत. ते आज एक यशस्वी व्यावसायिक आहेत, पण त्यांचे सूर जुळतात एलकुंचवारांशी; आणि त्यांच्या कॅमेऱ्याला आव्हान देतात ग्रेसच्या कविता!