Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेनेचा काेणता गट मोठा ठाकरे की शिंदे? दसरा मेळाव्यानंतर ठाकरे व शिंदे गटात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 06:34 AM2022-10-09T06:34:32+5:302022-10-09T06:34:54+5:30
आम्ही म्हणतोय पक्षाची संपूर्ण ताकद आमच्याकडे आहे, आमचाच मूळ पक्ष आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेला आमचा जो दसरा मेळावा झाला, त्याला किती लोक होते आणि त्यांच्याकडे किती लोक होते? हे सगळ्यांनी बघितलेले आहे.
अरविंद सावंत, खासदार, शिवसेना
खरंतर कोणाचा गट मोठा की खरा, हा माझा प्रश्न आहे. कारण त्यांच्या मेळाव्याला कोण लोक होते ते तुम्ही पाहिले आहे. कारण आपण कुठे आलोय, कुणासाठी आलोय, कुणाचे भाषण ऐकायला आलोय, याची माहिती नसलेल्या लोकांना नेऊन सदस्यत्वाचे अर्ज भरले असतील तर त्या मोठ्या आकड्याला काय किंमत आहे?
पक्षाची सदस्य नोंदणी ही पक्षाशी बांधिलकी असलेल्या लोकांची असायला लागते. त्यांच्या मेळाव्याला गेलेल्या काही लोकांनी सांगितले की, आम्ही उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला आलो आहे, कुणाचा कुणाला मेळ नाही. मी समजा काही ठिकाणी फिरलो, ५० रुपये देतो सांगितले आणि अर्ज भरून घेतले तर आयत्या वेळी १० हजार अर्ज भरू शकतो. भाजपने केले होते मिस कॉल द्या आणि पक्षाचे सदस्य व्हा. त्याचे काय झाले? मग खरे सदस्य कोणाचे? आमच्या सोबत आकडाही मोठा आहे, ते सोडून द्या; पण प्रश्न आहे खरी सदस्यता कोणाची? आमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आकडा आहे आणि खराही आहे. आम्ही सत्यप्रत निवडणूक आयोगाकडे सादर केली. ते आता काहीही दावा करतात. प्रत्यक्ष सुनावणीवेळी बघू ना. चिन्ह आमचेच आहे ते काढून घेऊ नये, असे आमचे निवडणूक आयोगापुढे म्हणणे असेल.
किरण पावसकर, प्रवक्ते, शिंदे गट
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पक्ष चिन्हाचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचलेले आहे. त्यामुळे आता आपल्या मनात एकच प्रश्न राहतो की, जे मतदार उन्हा-पावसात उभे राहून कुठल्याही पक्षाला मतदान करतात त्यांना कुठे तरी न्याय देण्याची गरज आहे. त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर हा निर्णय झाला पाहिजे. निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची सगळी कागदपत्रे सादर केली आहेत.
विरोधी गट मात्र वेळकाढूपणा करत आहे. ते मुदत मागत आहेत. निवडणूक आयोगाने मतदार जास्त कुणाकडे आहे हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आमचे म्हणणे आहे. गट, आमचा मोठा आहे. आमदार जास्त कोणाकडे आहेत, तर ४० आमदार आणि काही अपक्ष आमदारही आमच्याकडे आहेत. १२ खासदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे यांना निवडून देणारे मतदार आहेत त्यांना निवडणूक आयोग न्याय देणार आहे का?, हा खरा प्रश्न आहे. त्याशिवाय १४ राजकीय प्रतिनिधी, ११ राज्य प्रभारी आणि १ लाख ६६ हजारांहून अधिक प्राथमिक सदस्य आमच्याबरोबर आहेत. त्यामुळेच धनुष्यबाण त्यांनी वापरू नये यासाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही म्हणतोय पक्षाची संपूर्ण ताकद आमच्याकडे आहे, आमचाच मूळ पक्ष आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेला आमचा जो दसरा मेळावा झाला, त्याला किती लोक होते आणि त्यांच्याकडे किती लोक होते? हे सगळ्यांनी बघितलेले आहे.