एल्विशला कोणता खासदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला? संजय राऊतांचे फडणवीसांना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 12:26 PM2023-11-04T12:26:15+5:302023-11-04T12:27:07+5:30
देशात जे खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चालवतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे.- संजय राऊत
ड्रग्जमाफियाची सूत्र सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? असा सवाल करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचे उत्तर देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना द्यावे लागेल. रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषापासून तयार होणाऱ्या अमली पदार्थांचे सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचे नाव तुम्हाला माहित आहे. पण मुख्यमंत्र्यांना माहित नाही. त्याला एक खासदार मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो. त्यांना मिठ्या मारल्या जातात आणि त्यांच्या हातून गणपतीची आरती केली जाते. मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला उभे राहतात, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
देशात जे खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चालवतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत याला कोणी पोहोचविले? मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील हे खासदार कोण आहेत? त्यांचे काय आर्थिक संबंध आहेत? मुख्यमंत्र्यांच्या टोळीत कोणाशी संबंध आहेत? याचे उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावे लागेल, असे राऊत म्हणाले.
मी तोंड उघडले की, तुमची तोंड बंद पडतील, हे आता मुख्यमंत्र्यांनी बोलू नये. हा त्यांचा नेहमीचा शब्द आहे. पण आधी तुम्ही तोंड उघडा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. तसेच माझे अमित शाह यांना आवाहन आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत एक व्यक्ती पोहोचतो हा मोठा विषय आहे. ललित पाटील किंवा दुसरा कोणी असो, त्याला या राज्यातले मंत्री प्रोटेक्शन देत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे.