भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 01:55 PM2024-10-27T13:55:48+5:302024-10-27T14:00:50+5:30
Devendra Fadnavis on BJP Candidate List: मुंबईसह राज्यातील काही मतदारसंघातील विद्यमान आमदारांची तिकिटे भाजपकडून कापली जाणार अशी चर्चा होती. पण, भाजपने पुन्हा एकदा अनेकांना उमेदवारी दिली आहे. त्याबद्दलचे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis Latest Interview: हरयाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजप अनेक विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार, अशी चर्चा सुरू होती. मुंबईतील काही आमदारांची नावेही चर्चेत होती. पण, काही अपवाद वगळता भाजपने बहुतांश सगळ्याच विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. पुन्हा त्या आमदारांना तिकीट देण्यामागच्या कारणाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
एनडीटीव्ही मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी तिकीट देण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या 'मिटर'बद्दल सांगितले.
भाजपने विद्यमान आमदारांना कोणत्या निकषावर दिले तिकीट?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "असं आहे की, आम्ही यावेळी एक वेगळ्या प्रकारे... तीन-चार पद्धतीचा अभ्यास करून जे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या अँटिइन्कबन्सीचं मिटर तयार केलं होतं. मिटरमध्ये जे लोक ५० टक्क्यांच्या खाली आहेत, त्यांना आपण जागा द्यायची नाही. जे ५० टक्क्यांच्या वर आहेत, त्यांना जागा द्यायची असं ठरवलं. त्यातून जे ५० टक्क्यांच्या वर आहेत, त्यांना आम्ही जागा दिलेल्या आहेत. काही लोक ५० टक्क्यांच्या खाली आम्हाला दिसत आहेत, त्यांना आम्ही तिकीट देत नाहीये", असे उत्तर फडणवीसांनी दिले.
तीन पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे -फडणवीस
फडणवीस म्हणाले, "असं आहे की, राजकारणात आपल्याला व्यावहारिक असावं लागतं आणि जमिनीवरची परिस्थिती काय आहे, हे समजून निर्णय करावे लागतात. आज जमिनीवरची परिस्थिती हीच आहे की, तीन पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे."