"पहाटे झाले ते संध्याकाळी होईल, १० आमदार बोलले; पवार यांच्यासोबतच्या बैठकीतूनच शिंदे कॅम्पमध्ये फोन"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 01:47 PM2022-06-26T13:47:26+5:302022-06-26T13:48:04+5:30
राऊत म्हणाले, की सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. काल आमच्या बैठकीत शिंदे गटातील दहा आमदारांशी बोलणे झाले. ते मुंबईत आले की आमच्याकडे येतील. जे पळाले त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही.
मुंबई : शरद पवार, अजित पवार हे नेते शुक्रवारी सायंकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला आले, तेव्हा तिथूनच एकनाथ शिंदे यांच्याकडील दहा आमदारांशी आमचे बोलणे झाले, ते यायला तयार आहेत, असा दावा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. पहाटेचा शपथविधी टिकला नव्हता, जे पहाटे झाले तेच सायंकाळी होईल, असा टोलाही त्यांनी हाणला.
राऊत म्हणाले, की सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. काल आमच्या बैठकीत शिंदे गटातील दहा आमदारांशी बोलणे झाले. ते मुंबईत आले की आमच्याकडे येतील. जे पळाले त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही.
राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? स्वत:ला वाघ म्हणवता मग बकरीसारखे का पळता? या पळून गेलेल्या आमदारांवर ११ कोटी जनतेचा अविश्वास आहे, असा टोलाही राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
मी देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झाले ना ते आता सायंकाळी होईल, फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये. भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसेल. ते विरोधी पक्षनेते आहेत. जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आमचे आम्ही बघून घेऊ, तुम्ही मधे पडू नका, असेही राऊत म्हणाले.
शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. २०१९ साली भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली. ही गोष्ट एकनाथ शिंदेना माहिती आहे. जर २०१९ साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असते, असेही संजय राऊत म्हणाले.