...तर बजरंगी भाईजान ‘सरहद’ही पार करेल!
By admin | Published: July 10, 2015 04:29 AM2015-07-10T04:29:38+5:302015-07-10T04:32:37+5:30
देशभरात जोरदार चर्चा सुरू असलेला आणि ईदच्या दिवशी प्रदर्शित होत असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ‘सरहद’पार म्हणजेच पाकिस्तानही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे
मुंबई : देशभरात जोरदार चर्चा सुरू असलेला आणि ईदच्या दिवशी प्रदर्शित होत असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट ‘सरहद’पार म्हणजेच पाकिस्तानही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करत असून, चित्रपटाची एक प्रत पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाकडेही पाठवल्याचे अभिनेता सलमान खानने खास ‘लोकमत’ला सांगितले.
‘लोकमत’च्या संपादकीय चमूसोबत त्याने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्याने ‘बजरंगी भाईजान’ आणि भारतीय व पाकिस्तानी चित्रपटांबाबत आपले मत स्पष्ट शब्दांत मांडले. तो म्हणाला की, पाकिस्तानात भारतीय चित्रपटांचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. मग हा चित्रपट तिकडे प्रदर्शित होण्यात गैर काय? दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने, एकमेकांच्या कलाकारांचे कार्यक्रम, इतर विषयांचे आदानप्रदान होते; तर मग सिनेमाच्या बाबतीतच का प्रश्नचिन्ह उभे केले जाते हे न समजणारे कोडे आहे. आपल्या सेन्सॉर बोर्डाप्रमाणे त्यांच्याकडेही सेन्सॉर बोर्ड आहे, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तपासून पाहिला जातोच; मात्र विनाकारण प्रत्येक चित्रपटाच्या वेळेस वाद उभे करणे चांगले नाही. चाहत्यांना चित्रपट हवे असतील तर त्यात वावगे काय, असा सवालही त्याने केला.
ईदच्याच दिवशी तेथे ‘राँग नंबर’ आणि ‘बिन रोये’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘बजरंगी भाईजान’मुळे या चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चित्रपटासाठी ‘सरहद’पार प्रमोशन करण्याची आपली तयारी असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
------------
‘बजरंगी भाईजान’ या ‘लोकमत’ मीडिया
पार्टनर असलेल्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान याने संपादकीय चमूशी अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा केली. या वेळी त्याने सोशल मीडिया, कलेचे आदानप्रदान आणि त्याचा मराठीशी असलेला संबंध यावर भाष्य केले.
सलमानसोबतचा सविस्तर संवाद उद्याच्या अंकात