३७०चा आनंद साजरा करताना ३७१च्या घोळाकडे दुर्लक्ष नको- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:22 AM2019-08-10T03:22:31+5:302019-08-10T06:20:18+5:30
बहुमताच्या जोरावर माध्यमांवर दडपण आणलं जात असल्याचा आरोप
मुंबई : जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३७० कलम हटवल्याबद्दल पेढे वाटले जात आहेत. मात्र, देशातील ३७१ मतदारसंघांमध्ये भाजपने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार करून जनमताशी प्रतारणा केली, यावर कोणी बोलायला तयार नाही. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. कोणी कितीही संताप व्यक्त केला व कितीही टीका केली, तरी ते निवडून येणार आहेत, याचा त्यांना विश्वास आहे हा सत्तेचा माज आहे. भाजप सोडून राज्यातील सर्व राजकीय पक्ष एकत्र जरी आले, तरी भाजपच जिंकणार. कारण ईव्हीएम मशिन भाजपच्या ताब्यात आहेत, असा आरोप त्यांनी केला. बहुमताच्या जोरावर माध्यमांवर दडपण आणले जात आहे, असेही ते म्हणाले.
ईव्हीएम हटवण्याबाबत मी दिल्लीत निवडणूक आयोगाची, सोनिया गांधींची व ममता बॅनर्जींची भेट घेतली. त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे, याची माहिती दिली. त्यांनीही हा धोका मान्य केला व या मुद्द्यावर सोबत असल्याची ग्वाही दिली. मला ईडीची नोटीस आल्याचे वृत्त निराधार आहे, असे ते म्हणाले. मोदींच्या शिक्षणाबाबत माहिती मागितल्याने माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. माहिती कायद्यावर सरकारी अंकुश आणणारा कायदा केला गेला, असे ठाकरे म्हणाले.
एका व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा कायदा करण्यात आला. सामाजिक किंवा राजकीय आंदोलन केल्यास त्याला दहशतवादी ठरवून अटक करण्याचे आदेश अमित शहांना मिळाले आहेत. बहुमत असल्याने काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचे म्हणून इंटरनेट बंद करण्यात आले. जमावबंदी लागू करण्यात आली. भविष्यात महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ यांच्याबाबतीत घडू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
जेट एअरवेज बंद पडली, एअर इंडिया तोट्यात गेली, बीएसएनएलला ५४ हजार कोटींचा तोटा झाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीत, देशातील वाहन क्षेत्र प्रचंड अडचणीत असून, त्यामुळे किमान १० लाख कुटुंबे अडचणीत येण्याची भीती आहे. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात १४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सुमारे सहा लाख मध्यम उद्योग बंद पडले आणि हे सर्व एका माणसाला नोटाबंदीचा झटका आल्याने झाल्याची कडवट टीका राज यांनी केली.
३७० कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले. पण अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे, जिथे ३७० कलम नाही. मग तिथे गेल्या पाच वर्षांत रोजगार का निर्माण करू शकला नाहीत, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये, म्हणून समान नागरी कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे आणून नागरिकांचे लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमच्या जोरावर मतदान फिरविल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुका, २०१७ च्या महापालिका निवडणुकांत मनसेचा जो निकाल समोर आला, तो मान्य नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे काही खासदार भाजपला मंत्री म्हणून नको होते नेमके त्यांनाच पाडले गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
इव्हीएमविरोधी मोर्चा पूरस्थितीमुळे ढकलला पुढे
देशातील निवडणुका फक्त मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, या मागणीसाठी २१ तारखेला काढला जाणारा मोर्चा पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पुढे ढकलण्यात आला आहे. त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली.