परीक्षेचा अभ्यास करताना...

By admin | Published: March 5, 2017 01:48 AM2017-03-05T01:48:51+5:302017-03-05T01:48:51+5:30

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि त्यानंतर दहावी, पदवी व इतर शाखांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्च महिना म्हणजे उन्हाळा आणि परीक्षांचे टेंशन यांची

While examining the exam ... | परीक्षेचा अभ्यास करताना...

परीक्षेचा अभ्यास करताना...

Next

- डॉ. शिवांगी झरकर

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि त्यानंतर दहावी, पदवी व इतर शाखांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्च महिना म्हणजे उन्हाळा आणि परीक्षांचे टेंशन यांची जुगलबंदी. जसे बारावीच्या परीक्षांच्या तारखा घोषित होतात त्यानंतर, रणशिंग फुकल्यासारखे सर्व विद्यार्थ्यांना वाटू लागते आणि अभ्यासाची रेलचेल सुरू होते. परीक्षा म्हणजे दुसरे-तिसरे काही नसते... ते असते आपल्या तयारीची, आपण केलेल्या अभ्यासाची आपल्याला असलेली ओळख, म्हणून सर्वप्रथम घाबरणे सोडा. कारण घाबरल्याने तुम्ही जास्त खालावता, हृदयाची गती वाढते, हात-पाय थंड पडतात आणि रक्त गोठते... थोडक्यात, मेंदू आणि मन यांचा एकमेकांशी असलेला समतोल बिघडतो. म्हणून आज आपण जाणून घेऊ या परीक्षेचा अभ्यास करताना काय करावे आणि अभ्यासाची उजळणी कशी करावी.
पूर्ण वर्ष जे काही अभ्यासात शिकलो आहोत, त्याला पूर्णत्वाला नेण्याची वेळ जवळ आली आहे, म्हणजे वर्षभराचा अभ्यासाचा ९५% भाग हा पूर्ण झाला आहे आणि जो ५% भाग उरला आहे... तोच भाग आता ९५%, तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. म्हणून या उरलेल्या ५% भागाला, आपले १००% देऊन यशस्वी करायची वेळ जवळ आली आहे, या अमूल्य वेळेला पैशांप्रमाणे जपून वापरा आणि वाचवायचा प्रयत्न करा.

परीक्षेचा आराखडा आणि परीक्षकाची मानसिकता
आराखडा, मार्कांची वाटणी समजून घ्या.
कोणते प्रश्न कितीवेळा आणि कधी येऊन गेले आहेत ते तपासून घ्या. ८०% जे मुद्दे / अभ्यास लक्षात आहेत त्यावर जास्त लक्ष द्या आणि राहिलेले २०% त्याचाही अभ्यास करा; पण सर्व लक्ष जे येत नाही, त्यावर घालण्यापेक्षा जे येते त्यावर घाला. कमी मार्कांच्या प्रश्नांसाठी जास्त वेळ देऊ नका, नाहीतर मोठे प्रश्न राहून जातील. मोठ्या गुणांच्या प्रश्नांसाठी उत्तरे मुद्देसूद आणि प्रत्येक मुद्द्याला क्रमांक घालून सोडवा, जेणेकरून तुमचा पेपर नीटनेटका वाटेल आणि परीक्षकांना तपासायला त्रास होणार नाही. हवे असेल तिथे डायग्राम काढा म्हणजे तुमच्या उत्तराचे महत्त्व निर्माण होईल आणि मार्क्स वाढतील. पेपर्स लिहिताना एक पाण्याची बाटली सोबत ठेवा, त्याचबरोबर ३-४ खजूर, चॉकलेट किंवा गोळी तोंडात ठेवा, जेणेकरून तुम्हाला थकावट येणार नाही, घसा कोरडा पडणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे जरी टेंशन आले, तरी विचार करताना तुम्ही घाबरणार नाही. अशा प्रकारे सर्व नियम आणि अभ्यासाचे व परीक्षेचे नियोजन तुम्ही केले, तर परीक्षा तुम्हाला कठीण वाटण्यापेक्षा हवीहवीशी वाटेल. म्हणून ध्यानात ठेवा, परीक्षेत स्वत:शी जिंकलात, तर मार्कांशी आपोआप जिंकाल. सर्वांना शुभेच्छा!

कोणती काळजी घ्यावी? : अभ्यास करताना प्रत्येक ३० मिनिटांनी कमीतकमी ५ मिनिटांची विश्रांती घ्यावी. त्यात तुम्ही शांतता देणारे संगीत, ध्यानसाधना, अनुलोम-विलोम यांसारखे श्वासाचे व्यायाम किंवा घरातल्या घरात चालणे, असे थोडे-थोडके व्यायाम करू शकता. जेणेकरून मेंदू सक्षम राहतो आणि ताजेपणा टिकवून ठेवतो.


दर १०-१५ मिनिटांनंतर एक घोट पाणी प्या. जेणेकरून अभ्यास करताना शरीरातील उष्णता आणि पित्त वाढणार नाही. शरीराचे तापमान कायम ठेवण्यासाठी पाणी हा उत्तम उपाय आहे.

विविध प्रकारे अभ्यास कसा करावा?
अभ्यास करताना विषयालगतचे व्हिडीओ किंवा आॅडिओ ऐकावेत. आॅनलाइन माहिती इंटरनेटवरून मिळवावी. व्हिजन बोर्ड बनवावा. अभ्यास केलेले मुद्दे एकदातरी मोठ्याने किंवा मित्र- मैत्रिणींसमोर बोलून दाखवावेत, जेणेकरून तुमच्या आणि तुमच्या मेंदूच्या सर्व गोष्टी पक्क्या लक्षात राहतील.

ताणतणाव कसा दूर करावा?
अभ्यास करताना ध्यानमुद्रेचा वापर करावा, त्यामुळे केलेला अभ्यास लक्षात राहतो. अभ्यास सुरू करताना पुस्तकावर हात ठेवून मोठ्याने बोला की, ‘मी हुशार आहे. माझा संपूर्ण अभ्यास झाला आहे. माझी या विषयाची उजळणी झाली आहे. मी या विषयात उत्तम गुण मिळवणारच.’

विषयाची उजळणी कशी करावी?
जर एखाद्या विषयाची उजळणी आपण करणार आहोत तर ती पुढीलप्रमाणे करावी-
पहिली ३० मिनिटे : सर्व महत्त्वाचे शीर्षक वाचून घ्यावेत. कारण आपल्या मेंदूला खूप सारी माहिती एकाच वेळेला साठवण्याची सवय नसते आणि मेंदू ते सर्व करण्यासाठी लगेच तयार होत नाही. म्हणून सर्व पाठांतर किंवा उजळणी करायला जाऊ नका, नाही तर, पुढचे पाठ आणि मागचे सपाट अशी गोष्ट होईल.
दुसरे २ तास : या दोन तासांत तुम्ही प्रत्येक धड्यातील किंवा शीर्षकातील महत्त्वाचे मुद्दे किंवा सह-शीर्षक लक्षात ठेवा.
तिसरे ३-४ तास : ह्या वेळेत प्रत्येक परिच्छेदातील महत्त्वाचे मुद्दे, शीर्षक, आराखडा यांची यादी लक्षात ठेवा, त्यामुळे सर्व उत्तरे, सारांश तुमच्या डोक्यात पक्के बसेल आणि तुमच्या मेंदूत त्या त्या विषयाचा एक आराखडा निर्माण होत जाईल.
चौथे १ तास : या तासात तुम्ही एका वाक्यात उत्तरे, जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, असे प्रश्न करा, जेणेकरून सर्व अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि मेंदू थकणार नाही.

Web Title: While examining the exam ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.