गंमतीने फाशी दाखवताना पोलिसाचा जीव टांगणीला
By admin | Published: June 27, 2016 08:54 PM2016-06-27T20:54:08+5:302016-06-27T21:42:39+5:30
फाशी कशी घेतात याचे प्रात्यक्षिक गंमतीने पत्नीला दाखविणाऱ्या पोलिसालाच गळफास लागल्याची विचित्र घटना भांडुपमध्ये सोमवारी घडली. गोविंद बालाजी देवळे (२६) असे पोलिसाचे
- प्रकृती चिंताजनक
मुंबई : फाशी कशी घेतात याचे प्रात्यक्षिक गंमतीने पत्नीला दाखविणाऱ्या पोलिसालाच गळफास लागल्याची विचित्र घटना भांडुपमध्ये सोमवारी घडली. गोविंद बालाजी देवळे (२६) असे पोलिसाचे नाव असून तो सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अग्रवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
मुळचे बीड येथील रहिवासी असलेले देवळे यांची २०१४ सशस्त्र पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. घाटकोपर भटवाडी येथील गोळीबार प्रशिक्षण केंद्रात ते पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षापासून पत्नी प्रियांका आणि ११ महिन्यांच्या मुलीसोबत ते भांडुप टेंभीपाडा परिसरात राहतात. अडीच हजार रुपये घरभाडे ते देत आहेत. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ते कामावरुन घरी परतले. बाहेर पाऊस सुरु असल्याने पत्नीने त्यांना घरात कपडे टाकण्यासाठी दोरी बांधण्यास सांगितले.
सायंकाळी साडे चारच्या सुमारास घरात दोरी नसल्याने देवळेने पत्नीची नायलॉनच्या साडीचे एक टोक लोखंडी खांबाला बांधले. दुसरे टोक बांधत असताना देवळेने गंमत म्हणून कैद्याला फाशी कशी देतात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली. हीच गंमत त्यांच्या अंगलट आली. गळ्याभोवती त्यांनी साडीचे दुसरे टोक बांधले. आणि ही मस्ती सुरु असतानाच त्याचा पायाखालचा टेबल सरकला. गळ्याभोवती घेतलेला साडीचा फास आणखीन घट्ट झाला. क्षणात काय झाले हे पत्नीला समजलेच नाही. तिने तत्काळ मदतीसाठी शेजाऱ्यांकडे धाव घेतली. तेव्हा मदतीसाठी धावलेले घरमालक आणि स्थानिकांनी साडी कापून देवळेला तत्काळ अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. पोलीस नियंत्रण कक्षास देवळेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सुरुवातीला स्थानिकांकडून मिळाली.
ही माहिती मिळताच साडे सहाच्या सुमारास भांडुप पोलीस रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी देवळेंच्या पत्नीसह घरमालक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. तेव्हा वरील घटनाक्रम समोर आला. याची शहानिशा करत अधिक तपास तपास अधिकारी नितीन गिजे करत आहेत.