...तर नागपूरला विधानभवनाला घेराव घालणार, धनगर आरक्षणावरून गोपिचंद पडळकर आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 10:54 PM2023-10-22T22:54:53+5:302023-10-22T22:56:44+5:30
Gopichand Padalkar: धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रा काढत आहेत. यादरम्यान, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.
धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रा काढत आहेत. यादरम्यान, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही लोक आपल्या आरक्षणाला विरोध करतात, परंतु मुळात डॉ. आंबेडकरांनी आधीच आम्हाला आरक्षण दिलेले आहे. आता त्याची फक्त अंमलबजावणी होणे बाकी आहे, सरकार सोबतच्या बैठकीनंतर ६० दिवस पूर्ण होऊनही काही कारवाई झाली नाही, तर येत्या २१ नोव्हेंबर रोजी आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसिलदारांसमोर एक मोर्चा काढायचा आहे आणि ११ डिसेंबरला महाराष्ट्रातला धनगरांचा नागपूरला विधानभवन घेरण्यासाठी अधिवेशन काळात जायचं आहे,असे पडळकर यांनी म्हटले आहे.
गोपिचंद पडळकर म्हणाले की, मागील पंधरा दिवसांआधी जेंव्हा मी धनगर जागर यात्रा घोषित केली तेंव्हा पासून आपल्यात कशी फुट पाडतां येईल, याचे सर्व प्रयत्न महाराष्ट्रातला एक लांडगा करतोय. काही लोक आपला आरक्षणाचा विरोध करतात, परंतु मुळात डॉ. आंबेडकरांनी आधीच आम्हाला आरक्षण दिलेले आहे. आता त्याची फक्त अंमलबजावणी होणे बाकी आहे.
हे किती बहुजन विरोधी आहेत, हे यावरूनच सिद्ध होते की, काकाच्या विरोधात बंड केले पुतण्याने, पण टार्गेट व शिव्याशाप दिले जाताहेत छगन भुजबळांना. का? कारण ते माळी समाजातील आहेत म्हणून का? आधी त्यांनी उभारलेली समता परिषदेवर संपवण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेब हे मुख्यमंत्रिपदाच्या एकदम जवळ असताना यांनी कट कारस्थान करून एक आमदार पळवण्यास सर्वात मोठी भूमिका बजावली होती. नाहीतर त्याचवेळेस वंजारी समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला असता. नंतर बी. के कोकरे साहेबांनी उभारलेली चळवळ यांनी संपवली. म्हणजे काय तर बहुजनांचं नेतृत्व मोठं होऊ द्यायचंच नाही, असा आरोप गोपिचंद पडळकर यांनी केला.
गोपिचंद पडळकर पुढे म्हणाले की, बी,के कोकरेंनी यशवंत सेनेची स्थापना पवारांच्या विरोधात लढण्यासाठी स्थापन केली होती. ती बी के कोकरेंची यशवंत सेना पवारांच्या सांगण्यावरून पावले उचलतेय. याचे मला अतिशय दुख वाटतेय, वेदना होतेय. आपल्या लोकांना हे केंव्हा समजेल की आपला वापर आपल्याच समाजात फुट पाडण्यासाठी होतोय. याची जाणीव यांना व्हावी हीच प्रार्थना श्री खंडोबा बिरोबाच्या चरणी करतो, असेही पडळकर यावेळी म्हणाले.