देशरक्षण करताना गावच्या विकासाचं स्वप्नं अधुरं
By admin | Published: November 17, 2015 11:29 PM2015-11-17T23:29:11+5:302015-11-18T00:14:56+5:30
शहीद संतोष... तुझे सलाम : पोगरवाडीच्या भल्यासाठी पुढच्या महिन्यात घेतली जाणार होती गावकऱ्यांची बैठक
सातारा : अतिरेक्यांच्या गोळ्या छातीवर झेलत भारतमातेचं रक्षण करणाऱ्या शहीद संतोष महाडिकांचं एक स्वप्नं मात्र अधुरं राहिलं. त्यांना त्यांच्या पोगरवाडीचा विकास करायचा होता. त्यासाठी ते डिसेंबरमध्ये येऊन गावकऱ्यांची बैठकही घेणार होते.
काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना तीन वर्षांपूर्वी शौर्यपदक मिळाले होते. ईशान्य भारतात त्यांच्या टीमने दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता. म्यान्यमार येथेही त्यांनी आपल्या धाडसाची चुणूक दाखविली होती. ते मूळचे पोगरवाडी येथील असून, आरे गावात ते दत्तक गेले होते. त्यांच्या वृत्ताने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
सलग पाच वर्षे पोगरवाडीचे सरपंच असणाऱ्या मधुकर घोरपडे यांचे चिरंजीव संतोष यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. लष्करात दाखल झाल्यानंतर ‘मी देशाबरोबरच माझ्या गावासाठीही आयुष्यभर झटेन’ असे ते सतत बोलून दाखवत. त्यांची पत्नी उधमपूर येथे मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्याही मुलांसोबत बुधवारी साताऱ्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
पित्याचा वारसा चालवायचा होता...
शहीद संतोष महाडिक यांचे वडील मधुकर घोरपडे हे पाच वर्षे सातारा तालुक्यातील पोगरवाडीचे सरपंच होते. खासदार उदयनराजे अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही नेत्यांशी वडिलांचे चांगले संबंध होते. मात्र, सुमारे एक वर्षापूर्वी वडिलांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांनतरही घोरपडे घराण्याने नेतृत्त्वाची परंपरा पुढे चालू ठेवली. गेल्या आठवड्यातच संतोषच्या वहिनी शोभाताई जयवंत घोरपडे पोगरवाडीच्या सरपंच झाल्या आहेत. आयुष्यभर गावासाठी झटलेल्या वडिलांचा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे, असे संतोष नेहमी घरातील मंडळींसमोर बोलून दाखवित असे; मात्र, देशरक्षण करताना गाव विकासाचे स्वप्न अधुरे राहिले.
तीन दिवसांपूर्वीच संतोषचा आम्हाला काश्मिरहून घरी फोन आला होता. दिवाळीत येणे शक्य झाले नसले तरी डिसेंबरमध्ये सुट्या मिळणार आहेत, त्यावेळी किमान पंधरा दिवस तरी सातारा जिल्ह्यात मुक्काम करेन. तसेच आपलं गाव म्हणजे पोगरवाडीत सर्व गावकऱ्यांची एकत्र बैठक घेऊन गावच्या विकासासाठी एक चांगला आराखडा तयार करू. एकमेकांशी संघर्ष न करता गावचा विकास करण्यासाठी सर्वांची मानसिकता तयार करू, असे स्वप्नही संतोषने फोनवरून बोलताना आमच्यासमोर व्यक्त केले होते.
- जयवंत घोरपडे, बंधू