शिंदे गटाकडून व्हीप जारी, शिवसेनेच्या आमदारांनी गोव्याला यावे...; पुढे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:56 PM2022-06-30T18:56:24+5:302022-06-30T18:57:33+5:30
शिवसेनेतील बंडखोरीच्या राजकारणाचा पुढचा अंक शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील सुरुच राहणार आहे.
एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले आहे. परंतू त्यापूर्वीच शिंदे गटाने मोठी खेळी खेळली आहे. शिंदे गटाने शिवसेना आमदारांना व्हीप जारी केला आहे. यामुळे ठाकरेंसोबत असलेल्या १६ आमदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
शिंदे गटाने शिवसेना आमदारांना तातडीने गोव्याला यावे अन्यथा कारवाई होऊ शकते, असा व्हीप काढला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंसह १६ आमदारांना गोव्याला जावे लागण्याची शक्यता आहे. असे न केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
दीपक केसरकर यांनी आज याची माहिती दिली. एबीपीने याचे वृत्त दिले आहे. आम्ही शिवसेना आहोत. बहुतांश आमदार आमच्याकडे आहेत. यामुळे आमच्या नेत्यांनी काढलेला व्हीप पाळणे हे प्रत्येक शिवसेना आमदाराला बंधनकारक आहे. व्हीप पाळला नाही, तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे, असे केसरकर म्हणाले. केसरकर यांनी बुधवारी रात्री देखील अशाप्रकारचा इशारा दिला होता.
आपणच शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाने काढलेल्या या व्हीपविरोधात शिवसेना आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील बंडखोरीच्या राजकारणाचा पुढचा अंक शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील सुरुच राहणार आहे.