जिल्हाभरात २०० एकरावर पांढरा कांदा
By Admin | Published: March 3, 2017 02:58 AM2017-03-03T02:58:09+5:302017-03-03T02:58:09+5:30
रत्नागिरी-देवगडचा हापूस आंबा जसा कोकणचा राजा तशाच प्रकारे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला प्रतिष्ठा आहे.
दत्ता म्हात्रे,
पेण- रत्नागिरी-देवगडचा हापूस आंबा जसा कोकणचा राजा तशाच प्रकारे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला प्रतिष्ठा आहे. मार्च-एप्रिल महिन्यात येणारे सण व ग्रामदेवतांच्या जत्रामध्ये पांढऱ्या कांद्याच्या शुभ्र माळा ग्राहकांना आकर्षित करतात. पांढरा कांदा पिकाची शेती रायगडात वाढत असून अलिबाग, माणगावपाठोपाठ रोहा तालुक्यातही प्रायोगिक तत्त्वावर पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जात आहे. जिल्हाभरात तब्बल २०० एकरावर या पिकाचे उत्पादन होत असून अलिबागमधील पांढरा कांदा रुची व आरोग्याच्या दृष्टीने शंभर नंबरी सोनं ठरला आहे. पांढऱ्या कांद्याची जास्त विक्री पेण, वडखळ नाका व या ग्रामदेवतांच्या जत्रामध्ये होते. एकूणच प्रायोगिक व शास्त्रशुद्ध शेतीमुळे पांढऱ्या कांद्याचे पीक शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक पाठबळ देणारे ठरले आहे.
उत्पादनाच्या दृष्टीने एकरी ५० ते ५५ हजार रुपये नेट उत्पन्न देणारे हे पीक आहे. सध्या बाजारात दोन ते अडीच किलोची चांगली प्रतिमाळ १२० ते १३० रुपये तर मध्यम प्रतिची माळ १०० ते ११० रुपयाला मिळते. राज्यात जळगाव, धुळे, पुणे या जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र आहे. तर आपल्या शेजारी गुजरात राज्यात व मध्य प्रदेशातही कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कांदा प्रक्रिया उद्योगावर आधारित गुजरातमध्ये ८० तर अन्य राज्यात २० असे कारखाने आहेत. अनेक कंपन्या व मॉल मालक आता पांढऱ्या कांद्याच्या शेतीमधून थेट माल खरेदी करण्याचे करार करीत आहेत. अशा सर्वसमावेशक उत्पादन, विक्री, पुरवठा व मागणी या घटकांमध्ये कांदा पीक शेतकऱ्यांना फायदेमंद ठरत
आहे.
कांदा पिकाचे देशात मोठे क्षेत्र आहे. हे पीक हिरव्या पातीसह पांढरा कांदा जुड्या बांधून केल्या जाणाऱ्या विक्रीला मोठा ग्राहकवर्ग आहे. त्यामुळे प्रारंभापासून पीक काढेपर्यंत कांद्याची मागणी व पुरवठा यामध्ये मोठे जमेचे अर्थकारण जुळून येते. राजगुरूनगर येथील कांदा-लसूण पीक संशोधन संस्थेने पांढऱ्या कांद्यातील औषधी गुणधर्माची माहिती देशातील कृषी संशोधन करणाऱ्या संस्थेकडून मागविली असता त्यामध्ये अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे वाण पूर्ण कसोटीस उतरले आहे. त्यामुळे कांद्याचे औषधी गुणधर्म व आरोग्य संवर्धक असल्याने पांढऱ्या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. जगभरात आहारात कांद्याचा वापर सर्रास आढळतो. भारतातील सर्व प्रकारच्या आहारात कांद्याला विशेष महत्त्व आहे. जगभरात कांदा पीक घेतले जाते. विशेष म्हणजे लालसर शेडची रंगसंगती व पुणा फुरसरंगी वाण प्रसिध्द आहेत.
भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका या आशियाई देशांसहित जगातील ३५ देशांत या वाणाचे कांदा पीक प्रसिध्द आहे. मात्र स्थानपरत्वे यामध्ये वेगवेगळे गुणधर्म येतात. पांढऱ्या कांद्याची पावडर ही मसाला उत्पादक वापरू लागलेत. परदेशात तर या पावडरचा सर्रास वापर होत आहे. सध्या बाजारात कांदा, लसूण पेस्टही मिळू लागलीय. तरीही आपल्याकडे फोडणीचा कांदा तेलात तळण्याचेच प्रमाण जास्त आहे.
प्राचीन आयुर्वेदात कांदा हा गुणकारी मानला गेला आहे. खोकला, ताप यावर पांढऱ्या कांद्याचा रसाचा लेप लावला जातो, नपुंसकत्वाला बळ मिळविणे, शरीरात ऊर्जा निर्माण करणे, झोप लागणे, क्षयरोग, हृदयरोग, मूळव्याध आदीवर पांढरा कांदा गुणकारी व आरोग्यवर्धक आहे. कांद्यात ग्लुटामीन, अर्जिनाइन, सिस्टम, सेपोनीन ही रसायने असतात. त्यामध्ये अ, ब व क जीवनसत्व असते. यामुळेच आहारात कांद्याच्या वापराला महत्त्व आहे. आता तर पांढऱ्या कांद्यात औषधी गुणधर्म असल्याची ग्राहकांना माहिती मिळाल्याने कांद्याच्या वापरात वाढ झाली आहे. तब्बल ४०० ते ५०० जाती निर्माण झाल्या आहेत. कांद्यात असलेल्या एट्रोंसायर्जिग या रंगद्रव्यामुळे कांद्याचा रंग लालसर होतो. आपल्याकडील पांढऱ्या कांद्यात रंगद्रव्य नसते. युरोपमध्ये पिवळ्या व पांढरा कांद्याला मागणी व वापर आहे. आपल्याकडे पांढरा कांदा हा तीनही ऋतूत आहारात वापरला जातो. अन्नप्रक्रिया उद्योगात पांढरा कांदा जास्त वापरला जातो. सध्या बाजारात रेडी टू इट प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यात पांढऱ्या कांद्याचा जास्त वापर असतो.
>राजगुरूनगर येथील कांदा-लसूण पीक संशोधन संस्थेने पांढऱ्या कांद्यातील औषधी गुणधर्माची माहिती देशातील कृषी संशोधन करणाऱ्या संस्थेकडून मागविली असता त्यामध्ये अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे वाण पूर्ण कसोटीस उतरले
आहे.
कांद्याचे औषधी गुणधर्म व आरोग्य संवर्धक असल्याने पांढरा कांदा सध्या बाजारात भलताच भाव खात आहे. जगभरात आहारात कांद्याचा वापर सर्रास आढळतो.