द्रुतगती महामार्गाची श्वेतपत्रिका काढणार
By admin | Published: June 29, 2016 12:50 AM2016-06-29T00:50:16+5:302016-06-29T00:50:16+5:30
: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार करताना केलेली रचनाच चुकलेली असून, इंडियन रोड काँग्रेसने घालून दिलेले कोणतेही निकष काम करताना पाळण्यात आलेले नाहीत.
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार करताना केलेली रचनाच चुकलेली असून, इंडियन रोड काँग्रेसने घालून दिलेले कोणतेही निकष काम करताना पाळण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. अपघात रोखण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी संपूर्ण रस्त्याचे तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करून या रस्त्याची श्वेतपत्रिका राज्य शासनाला सादर केली जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी दिली. देशात मोठमोठे इंजिनिअर असतानाही कोणत्याही शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा वापर न करता तयार करण्यात आलेला हा रस्ता म्हणजे एक चेष्टाच आहे, अशी टीका करून अपघात रोखण्यासाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात या महामार्गावर कुलकर्णी यांच्या गाडीला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले त्यांचे चालक नीरजसिंग यांच्या नावाने नीरज लाईफलाईन फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, नीरज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शरद हर्डीकर, शिरीष कुलकर्णी, अमित कुलकर्णी, विजय जगताप या वेळी उपस्थित होते.
शिरोळे म्हणाले, ‘‘अपघात रोखण्यासाठी मोटार वाहन कायद्यात अनेक सुधारणा सुचविण्यात आल्या असून, हा सुधारित कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. याशिवाय, रस्त्यांच्या देखभालीसाठी तसेच रस्ते अपघातमुक्त करण्यासाठीही केंद्र शासनाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.’’ झगडे म्हणाले, ‘‘अपघातांची संख्या रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्या, तरी प्रामुख्याने अपघात होणारच नाहीत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची नियमित तापसणी यांसह वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. रस्ते रचनेत मूलभूत बदल करण्याची गरज निर्माण झाली असून, रस्त्यांच्या दुरवस्थेची आणि अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. ’’
राज्यमंत्री शिवतारे यांनी राज्य शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच, यापुढे सुधारणांच्या उपाययोजना करण्याची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगितले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
कोणताही रस्ता करताना त्यासाठी इंडियन रोड काँग्रेसने काही नियम घालून दिलेले आहेत. दुभाजकांची असलेली रचना, सर्व्हिस लेन, साईड गार्ड, आवश्यक त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल, प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर चालकांना थांबण्यासाठी जागा, महामार्गावर वाहन चालविण्यासाठी विशेष प्रशिक्षण, रस्त्यांच्या कामाचा दर्जा असे कोणतेही निकष पाळलेले नाहीत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने महामार्गावरील अपघातांची जबाबदारी कोणावरही निश्चित नाही. त्यामुळेच या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून अपघात रोखण्यासाठीची लढाई सुरू केली जाणार आहे. - डी. एस. कुलकर्णी, व्यावसायिक