आयुक्तांना कुणाची भीती वाटते?
By admin | Published: February 13, 2017 03:11 AM2017-02-13T03:11:48+5:302017-02-13T03:11:48+5:30
ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही आयुक्त संजीव जयस्वाल यांना काम करण्याची भीती वाटते. ते मध्यरात्री त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात.
ठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही आयुक्त संजीव जयस्वाल यांना काम करण्याची भीती वाटते. ते मध्यरात्री त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. आयुक्तांना नेमकी कुणाची भीती वाटते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला. आयुक्तांनाही भीती वाटेल अशी राजवट बदलून टाका, असे आवाहन त्यांनी ठाण्यातील मतदारांना केले.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आयुक्तांसारखा अधिकारी निर्भयपणे काम करू शकत नसेल, तर ्सा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या हाती पुन्हा महापालिकेचा कारभार देणार का, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. ठाण्यातील ७0 ते ८0 टक्के रहिवासी अनधिकृत इमारती आणि चाळींमध्ये वास्तव्यास आहेत. त्यासाठी अनेक वर्षांपासून क्लस्टरचा प्रश्न पालिका किंवा राज्य शासन सोडवू शकले नाही. हे चित्र बदलायचे असेल तर सत्ता परिवर्तनावाचून गत्यंतर नाही. ठाणे, उल्हासनगर पालिकांची निवडणूक बदल घडवणारी आहे. विधान परिषद निवडणुकीत कोकण आणि नाशिक मतदारसंघात आघाडीचे उमेदवार निवडून आले. ही सत्ताबदलाची नांदी असून मतदार भाजप-सेनेला जागा दाखवतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे उभारणीत एमआयडीसीचे तत्कालीन अध्यक्ष ठाण्याचे वागळे यांचा सिंहाचा वाटा आहे. एकेकाळी महाराष्ट्रात ठाणे-वागळे इस्टेट भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे होते. हे उद्योगधंदे गेले कोठे, बेरोजगारीचा प्रश्नही सुटलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)