‘मी कोण बाई, मलाच ठाऊक नाही?’
By admin | Published: January 19, 2016 01:30 AM2016-01-19T01:30:07+5:302016-01-19T01:30:07+5:30
नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले
ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) : नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले. ‘स्व’चे अस्तित्व, ‘स्व’शी संघर्ष यातूनच स्त्रीवादाचा आणि स्त्रीवादी साहित्याचा जन्म झाला. कवितेतून अनुभव व्यक्त करण्याचे धाडस स्त्रीने दाखवले. या प्रवासाचा अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे; त्यासाठी चिकित्सा, विश्लेषण सुरूच राहणार आहे, असे मत मान्यवर कवींनी व्यक्त केले.
८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ‘१९८० नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे’ या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे अध्यक्षस्थानी होत्या. परिसंवादात डॉ. मनोहर जाधव, सीमा रोठे, डॉ. समिता चव्हाण, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. रुपाली शिंदे, सुषमा करोगल यांनी सहभाग नोंदविला.
डॉ. कार्व्हालो म्हणाल्या, ‘‘स्त्री ही माणूसच आहे, हा विचार आजच्या कवितेतून दिसतो. आजच्या कविता आश्वासक, धाडसी वाटतात. पूर्वी स्त्रिया व्यक्त होऊ शकत नव्हत्या. त्या वेळी त्यांच्या वतीने दुसरे कोणीतरी लिहायचे. आजच्या मानवकेंद्रित कवितेने स्त्रीला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले.’’
प्रा. शिंदे यांनी सांगितले, ‘‘स्त्रीला शिक्षण मिळायला सुरुवात झाल्यावर तिने सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपला. कवितेच्या माध्यमातून स्त्रीला ‘अच्छे दिन’ आले. तिचे हे स्वतंत्र अस्तित्व मोठ्या मनाने समाजाने स्वीकारण्याची गरज आहे.’’
डॉ. चव्हाण म्हणाल्या, ‘‘बंड, असमानता हे स्त्रीच्या अनुभवविश्वाचे पदर आहेत. स्त्रियांची संवेदनशीलता, अनुभवविश्व, जाणिवा यामुळे कविता विस्तारते. मात्र, आदिवासी, मुरळी, श्रमिक, शरीरविक्रय करणाऱ्या महिला अशा विविध स्तरांमधील चित्र अद्याप कवितांमधून मोठ्या प्रमाणात मांडले गेलेले नाही. जुन्या, पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देऊन नवी परंपरा निर्माण करणाऱ्या कविता आता निर्माण होण्याची गरज आहे.’’
रोठे यांनी १९७५ नंतरच्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर स्त्रीच्या लाजरेपणाला शब्दांचे धुमारे फुटले, असे सांगत अंतर्मनातला कोलाहल व्यक्त करण्याचे कविता हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. आजची कविता बहुआयामी, चौमुखी आहे, असेही त्या म्हणाल्या.
सुषमा करोगल म्हणाल्या, ‘‘लेखकाचे अनुभवविश्व भावनिक, वैचारिक साद-प्रतिसादातून समृद्ध होते. एकसिक विचारप्रणाली कोणत्याही कलाविष्कारात दिसत नाही. पुरुषी मानसिकतेतून स्त्रीकेंद्रित होण्याचे काही प्रयत्न या काळात झाले आहेत.’’ (प्रतिनिधी)