महाराष्ट्रातील हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण ? पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 02:26 PM2021-11-17T14:26:04+5:302021-11-17T14:27:14+5:30
पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव, अमरावती, नांदेड आणि महाराष्ट्रातील इतर भागात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची रिपोर्ट गृह मंत्रालयाला सादर केला आहे. या रिपोर्टमधील काही माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, हिंसाचाराची संपूर्ण प्लॅनिंग फार पूर्वीच करण्यात आली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या तपासात आतापर्यंत सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या अशा 60-70 पोस्ट आढळून आल्या आहेत, ज्यांनी हिंसाचार भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडण्यात आल्याची बनावट पोस्ट करण्यात आली होती. यानंतर, व्हॉट्सअॅपवर हजारोंच्या संख्येने अनेक पोस्ट फॉरवर्ड करण्यात आल्या. याचा हेतू अधिकाधिक लोक या तथाकथित सुनियोजित दंगलीत जाणूनबुजून किंवा नकळत सहभागी व्हावे, असा होता. गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात अशा 36 सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे.
अशी होती दंगलीची टाइमलाइन
29 ऑक्टोबर रोजी पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जातात. 1 नोव्हेंबर रोजी जय संविधान संघटनेनंही जिल्हाधिकार्यांकडे निषेध नोंदविला.
6 नोव्हेंबर रोजी सरताज नावाच्या व्यक्तीचा एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. या ऑडिओद्वारे कथित चिथावणीखोर पद्धतीने म्हटले होते की, त्रिपुरातील अनेक मशिदी पाडण्यात आल्या असून हीच वेळ एकत्र येण्याची आहे.
7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत रझा अकादमीने त्रिपुरातील घटनांबाबत राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक मेसेज फॉरवर्ड करण्यात आले. 12 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती, नांदेड आणि काही भागात बंदला सुरुवात करण्यात आली आणि दुकाने बंद न करणाऱ्यांवर हिंसाचार करण्यात आला. 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी काही राजकीय कार्यकर्त्यांकडून दिवसभर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आले आणि त्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा बंदचे आयोजन करण्यात आले होते.