ठाण्यात स्थायीसाठी भाजपाची टाळी कोणाला?
By admin | Published: April 6, 2017 03:29 AM2017-04-06T03:29:14+5:302017-04-06T03:29:14+5:30
एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर आता शिवसेनेला स्थायी समितीवर कब्जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर आता शिवसेनेला स्थायी समितीवर कब्जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसने खो घालून राष्ट्रवादीला साथ दिल्याने शिवसेनेच्या स्थायी समिती मिळवण्याच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे आता स्थायीचा चेंडू थेट भाजपाच्या कोर्टात गेला आहे. परंतु, परिवहनच्या वेळेस ज्या पद्धतीने भाजपाच्या सदस्याने राष्ट्रवादीला टाळी दिली होती, ती आता जर दिली गेली, तर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जाणार आहे. त्यामुळे भाजपा आता कोणाला टाळी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.
ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली. त्यांना तब्बल ६७ जागांवर यश मिळाले असून स्थायी समितीची गणिते जुळवण्यासाठी ७० नगरसेवकांचे बळ त्यांना अपेक्षित होते. त्यानुसार, त्यांनी काँग्रेसला गळ घालून आपल्याकडे वळते केले होते. परंतु, दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्याने आणि दोन अपक्ष नगरसेवकांनीदेखील राष्ट्रवादीच्या कळपात घरोबा केल्याने शिवसेनेची स्थायीची वाट बिकट झाली आहे. एकूणच आता परिस्थिती बदलली असून शिवसेनेच्या गटात ६७ नगरसेवक असून स्थायी समितीत त्यांचे आठ सदस्य निवडून जातील. राष्ट्रवादीच्या गटात पक्षाचे ३४, काँग्रेसचे दोन आणि दोन अपक्ष असे ३८ सदस्य झाल्यामुळे त्यांचे ५ सदस्य निवडले जातील. तर, २३ नगरसेवक असलेल्या भाजपाचे तीन सदस्य निवडले जातील. स्थायी समितीचे सभापतीपद मिळवण्यासाठी ९ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपाचे सदस्य तटस्थ राहिले किंवा त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तरच तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे जाणार आहेत. काँग्रेस आणि भाजपाने या पदासाठी आघाडी केली, तर लॉटरी काढून अध्यक्ष निवडावा लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या शिवसेनेच्या रणनीतीला धक्का बसला आहे.
दरम्यान, आता स्थायीचा चेंडू थेट भाजपाच्या कोर्टात आला आहे. यासंदर्भात भाजपाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, आम्हाला श्रेष्ठींचे आदेश आहेत की, तुम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहायचे आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन करीत आहोत.
शिवसेनेला पाठिंबा द्यायची वेळ आली, तर त्याचाही निर्णय श्रेष्ठीच घेतील, असेही स्पष्ट केले आहे. असे असले तरीदेखील शिवसेनेला पाठिंबा दिल्यास त्या बदल्यात एक वर्ष स्थायी समितीचे सभापतीपद मिळवण्याचा भाजपाचा विचार असून त्यानुसार श्रेष्ठींना ही गोष्ट सांगण्याचाही स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे. (प्रतिनिधी)
>परिवहन समितीची पुनरावृत्ती होणार?
शिवसेनेला अडचणीत आणण्याचा विचारही सुरू असून राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेपुढील अडचणी वाढवायच्या, असा कयासही लावला जात आहे. मागील टर्ममध्ये परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेस, ऐन मतदानाच्या वेळेस भाजपाच्या एका सदस्याने राष्ट्रवादीला मत दिले आणि शिवसेनेच्या हातून परिवहन समिती हुकली होती.
तसाच काहीसा प्रयत्न भाजपाकडून केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकूणच, भाजपा कोणाला टाळी देणार, यावरच ठाणे महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.