शिवसेना द्वेषाने आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण?- एकनाथ शिंदे
By Admin | Published: May 28, 2017 05:53 PM2017-05-28T17:53:35+5:302017-05-28T17:53:35+5:30
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून सर्व परवानग्या प्राप्त करून घेतल्यानंतर आज विटावा स्कायवॉकचं खरंखुरं भूमिपूजन भूमिपुत्रांच्या हस्ते होत आहे
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 28 - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून सर्व परवानग्या प्राप्त करून घेतल्यानंतर आज विटावा स्कायवॉकचं खरंखुरं भूमिपूजन भूमिपुत्रांच्या हस्ते होत आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय शिवसेना कधीही घेत नाही. शिवसेना द्वेषाने आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे, हे ठाणेकरांना माहिती आहे आणि जनताच या धृतराष्ट्राला त्याची जागा दाखवून देईल, असा टोला ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणला.
या कामासाठीचा कार्यादेश अवघ्या एका महिन्यांपूर्वी प्राप्त झाला असून त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. स्थानिक भूमिपुत्र पांडुरंग मढवी आणि पंढरीनाथ खारकर या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजा करून या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.
आपणच हा प्रकल्प मंजूर करून घेऊन 2014 मध्येच याचं भूमिपूजन केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. मात्र, पालकमंत्री श्री शिंदे यांनी रविवारी गेल्या महिन्यात मिळालेल्या कार्यादेशाची प्रत दाखवून आव्हाडांची पुरती पोलखोल केली. कुठल्याही प्रकारच्या परवानग्या आणि कार्यादेश नसताना भूमिपूजन केलेच कसे, असा सवाल करून श्री शिंदे यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना फसवण्याचेच काम काही नेते करतात, मात्र जनताच त्यांना धडा शिकवेल, अशी घणाघाती टीका केली.
सुमारे 21 कोटी रुपयांच्या विटावा स्कायवॉकमुळे विटावा येथील रहिवाशांना थेट ठाणे स्थानकात सुरक्षितरीत्या जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. गेली तीन वर्षे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या पुलासाठी आवश्यक असलेल्या वनखाते, ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध परवानग्या प्राप्त करून घेतल्या. त्यामुळे आता या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
याप्रसंगी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आ. रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर रमाकांत मढवी, विभाग प्रमुख अविनाश पाटील, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.