युती कोणी तोडली? ठाकरे-भाजपात जुंपली; राऊत म्हणतात, 'या' नेत्यानं फोन केला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:01 PM2023-08-09T12:01:17+5:302023-08-09T12:02:21+5:30
शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? असा सवाल राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला.
मुंबई – शिवसेना-भाजपा युती उद्धव ठाकरेंमुळे तुटली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत केले. आता या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. २०१४ मध्ये भाजपानेच युती तोडली होती. तत्कालीन भाजपा नेत्याने तसा फोनही केला होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान दिशाभूल करत आहेत. २०१४ ची परिस्थिती पंतप्रधान मोदींना आठवायला हवी. २०१४ मध्ये शिवसेनेशी साथ कुणी आणि कशासाठी सोडली? हे अख्ख्या देशाने पाहिलंय. शिवसेना त्यानंतर स्वातंत्र्य निवडणूक लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झालोय असं भाजपाकडून अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेशी साथ कुणी सोडली याबाबत पंतप्रधानांनी जुना रेकॉर्ड तपासून पाहावा असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? शरद पवार आणि काँग्रेस यांचे वेगळे राजकारण आहे. लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखलं, आडवाणींना राजकीय सन्यास घेण्यासाठी भाग पाडलं असं आम्ही म्हणतो का? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच काँग्रेस आणि शरद पवार हादेखील त्यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी युतीवरून उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता.