राज्यातील बंद साखर कारखाने घेता का कोणी....़?
By admin | Published: December 13, 2014 12:39 AM2014-12-13T00:39:28+5:302014-12-13T00:40:19+5:30
राज्य बॅँकेची गोची : लिलावास सहावेळा प्रतिसादच नाही; कारखान्यांकडे अडकले कोट्यवधी रुपये
राजाराम लोंढे - कोल्हापूर --कोट्यवधी रुपयांची देणी अडकल्याने राज्य बॅँकेने विविध सहकारी साखर कारखाने व सूतगिरण्यांची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात सहा-सहा वेळा लिलावाची प्रक्रिया राबवूनही कारखाना घेण्यास कोणी पुढे येत नसल्याने राज्य सहकारी बॅँकेसमोर पेच निर्माण झाला आहे.
अवाढव्य काढलेले कर्ज व वारेमाप केलेल्या खर्चामुळे राज्यातील साखर कारखाने व सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. प्रामुख्याने मराठवाड्यातील अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. राज्य बॅँकेचे कोट्यवधी रुपये या कारखान्यांकडे अडकले आहेत. ‘रिकन्स्ट्रक्शन आॅफ फिनान्शिअल अॅसेट्स अॅँड एन्फोर्समेंट आॅफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अॅक्ट २००२’ अनुसार बॅँकेने हे कारखाने लिलावास काढले आहेत. गेले वर्षभर लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे; पण प्रतिसाद मिळत नसल्याने राज्य बॅँकेची गोची झाली आहे.
कारखान्यावरील अवाढव्य कर्ज व मालमत्ता यांची सांगड बसत नाही. काही कारखान्यांच्या बाबतीत सांगड बसली तर इतर अडचणी असल्याने कारखाना घेण्यास फारसे कोणी उत्सुक नाही. उसाचे क्षेत्र फारच कमी असते. ते क्षेत्र असूनही कारखाना चालविण्यास घेतल्यास सभासद व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल याची खात्री नसल्याने कारखाने घेण्याचे कोणी धाडस करीत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्य बॅँकेवर ‘कारखाने घेता का कोणी कारखाने...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
काही कारखान्यांची टेंडर प्रक्रिया चार ते सहा वेळा राबविली आहे. विहित वेळेत प्रतिसाद मिळत नाही. टेंडर भरण्याची वेळ गेल्यानंतर काहीजण येतात. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
- प्रमोद कर्नाड (व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बॅँक)
कारखान्यांवरील कर्जे
कारखाने/सूतगिरणीचे नावराज्य बॅँकेचे देणे एकूण देणे
जिजामाता साखर, दुसरबीड, बुलढाणा३४ कोटी ४ लाख६४ कोटी ३० लाख
डॉ. वि. वि. पाटील साखर, ४७ कोटी ५६ लाख६३ कोटी ९६ लाख,
अशोकनगर, बीड सहभाग-७० कोटी ९३ लाख
कडा साखर, आष्टी, बीड२७ कोटी २ लाख२६ कोटी ९९ लाख
देवगिरी साखर, फुलंब्री, औरंगाबाद७६ कोटी ९४ लाख२७ कोटी २५ लाख
पांझराकान साखर, साक्री, धुळे२८ कोटी ९५ लाख६३ कोटी २० लाख
बापूरावजी, हिंगणघाट, वर्धा३४ कोटी ५८ लाख९३ कोटी ६७ लाख
सहभाग-२७ कोटी ५८ लाख
संतनाथ साखर, वैराग, सोलापूर३४ कोटी ८४ लाख२६ कोटी १४ लाख
माउली सूतगिरणी, गेवराई, बीड६ कोटी ४५ लाख३१ कोटी ३८ लाख
शारदा यंत्रमाग विणकर, कुंभारी, सोलापूर१५ कोटी ३२ लाख२० कोटी २६ लाख
अकोट तालुका सूतगिरणी, अकोला१२ कोटी ५६ लाख९२ कोटी ४९ लाख
ताकही फुंकून पिण्याची वेळ
तीन-चार वर्षांपूर्वी राजकीय नेत्यांच्या ताब्यात राज्य बॅँक असताना बंद कारखाने घेण्यासाठी साखरसम्राटांच्या उड्या पडत होत्या; पण बॅँकेवर प्रशासक आहे. त्यातच तासगाव कारखान्याचे प्रकरण ताजे असल्याने बॅँकही ताकसुद्धा फुंकून पीत आहे. त्यामुळेच प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे.
प्रतिसाद न मिळण्याची
कारणे
गाळपास अपेक्षित अनुपलब्धता
मालमत्ता व देय रकमेची सांगड
सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबाबत साशंकता
बॅँकेच्या देण्यांशिवाय अडचणी