बिनविरोध निवडीनंतर उमेदवार नक्की कुणाचा..?

By admin | Published: November 5, 2016 01:04 AM2016-11-05T01:04:53+5:302016-11-05T01:04:53+5:30

राष्ट्रवादी व भाजपा दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवार आमचाच म्हटल्याने एक वेगळेच राजकीय नाट्य आज बारामतीत रंगले.

Who is the candidate after unincorporated selection ..? | बिनविरोध निवडीनंतर उमेदवार नक्की कुणाचा..?

बिनविरोध निवडीनंतर उमेदवार नक्की कुणाचा..?

Next


बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली खरी, परंतु नंतर मात्र राष्ट्रवादी व भाजपा दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवार आमचाच म्हटल्याने एक वेगळेच राजकीय नाट्य आज बारामतीत रंगले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने धनंजय रामदास आंबुरे यांना हमाल मापाडी गटातून उमेदवारी दिली होती, तर भाजपाने विलास चौधर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, दोघांनी अपक्ष नितीन सरक यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाने पहिल्यांंदाच राष्ट्रवादी कॉँग्रेसला आव्हान दिल्यानंतर उमेदवारी डावललेले, पण अपक्ष बिनविरोध निवडून आलेले नितीन सरक यांना ‘हे आमचेच’ म्हणण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढावली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने विद्यमान संचालक नितीन सरक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शेखर दाते, शिवसेनेचे राजेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे आदींनी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्याकडे सरक यांच्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे आज विठ्ठल चौधर यांना त्यांनी माघार घेण्यास सांगितले. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय आंबुरे यांनीदेखील माघार घेतल्याने सरक यांची बिनविरोध निवड झाली. सरक यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडे अगोदर मागणी केली होती.
>राष्ट्रवादी भवनात उडाली धांदल...
इतर ५ बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबरोबर सरक यांनादेखील सत्कारासाठी राष्ट्रवादी भवनामध्ये बोलावण्यात आले. सत्काराचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ते तेथून नीरा कॅनॉल संघात दाखल झाले. सत्कारात नाव पुकारले तेव्हा ते जागेवर नव्हते. त्यामुळे अन्य पाच जणांचा सत्कार करण्यात आला. दरम्यानच्या काळात सरक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर चांगलीच धांदल उडाली.
>सरक नेमके कोणाचे..?
बिनविरोध निवड झालेले नितीन शंकर सरक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला. धावपळ करून सरक यांना राष्ट्रवादी भवनात आणण्यात आले. इतर बिनविरोध उमेदवारांसमवेत त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, सरक हे विद्यमान संचालक आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत यादीतदेखील आंबुरे यांचेच नाव होते. मात्र, सरक निवडून आल्यावर ‘सरक आमचे अधिकृत उमेदवार होते,’ असे म्हणण्याची नामुष्की राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर ओढवली.

Web Title: Who is the candidate after unincorporated selection ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.