कुणी चेक देता का चेक!
By admin | Published: February 10, 2016 12:54 AM2016-02-10T00:54:43+5:302016-02-10T00:54:43+5:30
ठाण्यात होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी राज्य शासन, महापालिका, खासदार व आमदार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणाकडून अद्याप निधी मिळाला नसल्याने, ‘कुणी चेक देता का चेक’,
ठाणे : ठाण्यात होणाऱ्या नाट्यसंमेलनासाठी राज्य शासन, महापालिका, खासदार व आमदार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणाकडून अद्याप निधी मिळाला नसल्याने, ‘कुणी चेक देता का चेक’, असे म्हणण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. त्यांच्या मनातील भीती वाढत चालली आहे. मुख्य संमेलनाच्या सात दिवस आधीच म्हणजे येत्या शुक्रवारपासून स्थानिक कार्यक्रमांस सुरू होणार आहेत. मात्र, दोन दिवसांवर संमेलनाचे कार्यक्रम आले, तरी केवळ आश्वासने आहेत.
कल्याण-डोंबिवली पालिकेकडून ११ लाख, तर डी. वाय. पाटीलच्या पी. डी. पाटील यांचे पाच लाख वगळता, राज्य शासनाचे २५ लाख, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे १० लाख, आ. सुभाष भोईर यांनी घोषित केलेले पाच लाख अजूनही मिळालेले नाहीत. निधीअभावी कलाकारांचे मानधन व इतर प्रमुख कामे कशी मार्गी लावायची, हा प्रश्न पडला आहे.
- सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्याने ते संमेलनाचे कार्य सिद्धीस नेतील, याबद्दल आयोजकांमध्ये विश्वास आहे. मात्र, त्यांच्यामागे पालघर पोटनिवडणुकीपासून अनेकविध जबाबदाऱ्या असल्याने आयोजकांना चिंता वाटत आहे.