अब की बार... शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरवणार शरद पवार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:16 PM2019-11-11T12:16:09+5:302019-11-11T12:16:48+5:30
शिवसेना आणि भाजपा महायुतीमधील संबंध संपुष्टात आल्यानंतर आता राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडी स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई - शिवसेना आणि भाजपा महायुतीमधील संबंध संपुष्टात आल्यानंतर आता राज्यात शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडी स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात आकाराला येत असलेल्या नव्या समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भूमिका निर्णयक ठरणार आहे. मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेने दावा केला असला तरी त्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेला मिळणारे मुख्यमंत्रिपद आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शरद पवार यांच्या मर्जीनुसारच निश्चित होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला तिढा न सुटल्याने भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.शिवसेनेने दिवसागणिक अधिकच ताठर भूमिका घेतल्याने अखेरीस भाजपाने आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचा निरोप राज्यपालांना दिला होता. त्यानंतर राज्यापालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष पाठिंबा देतील की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस थेट सत्तेत सहभागी होईल, तर काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, असे बोलले जात आहे.
राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबरोबरच मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीही शरद पवार हेच निश्चित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांना विधिमंडळातील फारसा अनुभव नसल्याने त्यांच्या नावाला शरद पवार हे अनुकूल असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याच नावाला पवार यांच्याकडून सहमती मिळण्याची शक्यता अधिक आहे.