दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:03 PM2022-08-01T12:03:37+5:302022-08-01T12:04:35+5:30
उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील असं किरीट सोमय्या म्हणाले.
मुंबई - संजय राऊतांवर आधीही गुन्हा झाला आहे. मेधा सोमय्यांवरील मानहानीची सुनावणी सुरू झालीय. स्वप्ना पाटकर, पत्राचाळ घोटाळा यात कारवाईला सुरुवात झालीय. आणखी वसई-विरारचा घोटाळा, परदेश दौरा, दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोण भेटलं होतं. कुठला बिल्डर होता आणि कुठल्या देशातून आला होता. जेव्हा हे सगळं बाहेर येईल तेव्हा नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यात स्पर्धा सुरू होणार असा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील. दापोली कोर्टात अनिल परब यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची याचिका दाखल झाली आहे. १७ ऑगस्टला त्यावर निर्णय होणार आहे. उद्धव ठाकरेंकडे नसलेल्या शिवसेनेची दयनीय अवस्था आहे. शिंदे-फडणवीस राज्यात मजबूत सरकार चालवत आहेत. दबावामुळे संजय राऊतांवर कारवाई होत नव्हती. स्वप्ना पाटकर यांच्यावर दादागिरी, धमक्या देणे या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे असं त्यांनी सांगितले. तसेच संजय पांडे यांच्या माफियागिरीने संजय राऊत यांच्यावरील गुन्हे दडपले होते. उद्धव ठाकरेंकडे आमदार, खासदार किती हेच त्यांना माहिती नाही असा टोलाही सोमय्यांनी लगावला.
महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
संजय राऊतांना अटक केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. याचदरम्यान आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
ते पैसे शिवसैनिकांच्या अयोध्या दोऱ्याचे
संजय राऊत यांचे बंधु आमदार सुनील राऊत यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण बनावट आहे. ईडीजवळ संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याशी संबंध असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. ईडीला जे ११.५ लाख रुपये सापडले आहे ते शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्यासाठीचे आहेत. त्या पैशांवर एकनाथ शिंदे अयोध्या टूर असंही लिहिण्यात आले होते. संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर केले जाईल. राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीचे अधिकारी करणार आहेत. ईडीने रविवारी राऊतांच्या घरी छापेमारी केली. यावेळी त्यांच्या घरातून ११.५ लाख रोकड जप्त करण्यात आली. ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ईडी शिवसेना आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे.