‘स्नेहज्योती’च्या अंध मुलांना देईल का कुणी दृष्टीचे दान?
By Admin | Published: February 25, 2015 10:16 PM2015-02-25T22:16:43+5:302015-02-26T00:14:07+5:30
श्वास चित्रपटातील दृश्ये पाहून सगळेचजण हेलावतात. परंतु प्रत्यक्षात स्नेहज्योतीच्या मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर...?
शिवाजी गोरे - दापोली -- माणसाच्या जीवनात रोजच सूर्य उगवतो व मावळतो, दिवसाचा प्रकाश व रात्रीचा काळोख असतो. परंतु ज्यांनी प्रकाशच पाहिला नाही, अशांना प्रकाश व रात्रीच्या काळोखाची किंमत सारखीच असल्याची भावना त्यांच्या मनात असते. दिवस असो की रात्र अंधांच्या आयुष्यात कायमचाच अंधार असतो. असे असले तरीही जगण्याची उमेद मात्र कायम असते. दृष्टीहीन मुलेही बुद्धीने तल्लख असतात, हे अंधत्त्वावर मात करुन स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, घराडी येथील मुलांनी दाखवून दिले आहे. या अंध मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट येण्यासाठी समाजाने नेत्रदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.
मंडणगड तालुक्यातील घराडी या छोट्याशा खेडेगावात आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन बहिणींनी मिळून १२ वर्षांपूर्वी कोकणातील पहिली अंध शाळा सुरु केली. सुरुवातीच्या काळात अंध शाळेत मुले पाठविण्यासाठी पालक तयार होत नव्हते. २००२ साली चार अंध मुलांना एकत्र करुन छोट्याशा घरात ही अंध निवासी शाळा सुरु झाली. आज या शाळेत ३० मुले आहेत. अनेक मुले या शाळेत शिक्षण घेऊन बाहेर पडली. स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयात आता आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या अंध निवासी शाळेला शासनाची ८वीपर्यंतची मान्यता आहे. समाजातील दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयाची घोडदौड सुरु आहे. दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून शाळेला मदत मिळाली. शाळेच्या समस्या सुटल्या. परंतु मुलांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे नेत्रदानाची.पूर्वीच्या काळी डोळ्यांच्या आजाराची साथ येत असे. त्यातून दृष्टी जाणे, काही वेळेला गरोदर महिलेला जीवनसत्व मिळाले नाही तर बाळाला दृष्टी नसणे किंवा जन्मजात आंधळे मूल जन्माला येणे असे प्रकार घडत असत. परंतु आता विज्ञान प्रगत झाले आहे. त्यामुळे अंध बाळ जन्माला येणे किंवा डोळ्यांच्या साथीचे आजारसुद्धा कमी झाले आहेत. समाजात अंधत्वाची टक्केवारी झपाट्याने कमी झाली आहे. लोकसंख्येच्या १ टक्कासुद्धा अंध व्यक्तीची संख्या आढळणार नाही. स्नेहज्योती अंध विद्यालयातील ३० मुलांना नेत्रदानाची गरज आहे. अंध मुलांच्या जीवनातील अंधार कायमचा दूर करायचा असेल, तर त्यांना गरज आहे समाजाच्या नेत्रदानाची. घरातील लाईट क्षणभर गेला व अचानक अंधार झाला तर आपण कासावीस होतो. परंतु ज्यांच्या आयुष्यात कायमचाच अंधार आहे, त्यांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर कल्पनासुद्धा करु शकत नाही. श्वास चित्रपटातील दृश्ये पाहून सगळेचजण हेलावतात. परंतु प्रत्यक्षात स्नेहज्योतीच्या मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर...?
नेत्रदान करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर नेत्रदान करायचे असल्याचा फॉर्म भरुन द्यायचा असतो. कोणत्याही सरकारी दवाखान्यात आपण नेत्रदान करु शकता. परंतु त्यासाठी सरकारी दवाखान्यात यंत्रणा अपुरी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ रत्नागिरी व कामथे येथेच मृत्यूनंतर नेत्र काढण्यात येणारे डॉक्टर व लॅब आहे. एखाद्या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे काढून केमिकलमध्ये ठेवण्याची प्रक्रिया ४० मिनिटांची आहे. मृत्यू झाल्यानंतर ४० मिनिटात प्रक्रिया झाली नाही तर नेत्रदान होऊ शकत नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे वेळेत काढण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात लॅब व टेक्निशियनची गरज आहे.
- डॉ. प्रदीप भागवत,-उपजिल्हा आरोग्य अधिकारी, दापोली
पुढाकाराची गरज
दृष्टीहीन व्यक्तीला नेत्रदानाची गरज आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान होऊ शकतात. नेत्रदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु समाजात नेत्रदानाबद्दल अजूनही जनजागृती होणे गरजेचे आहे. नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे मृत्यूनंतर डोळे काढून लॅबला पाठविले जातात व त्याची योग्य तपासणी करुन ते डोळे गरजवंताला बसवले जातात.
सुंदर जग पाहण्यासाठी त्यांना डोळ्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आयुष्यातील काळरात्र घालवून त्यांचे जीवन प्रकाशमय करायचे असेल तर समाजाच्या मदतीची गरज आहे. समाजात नेत्रदानाची अजूनही फारशी जागृती झालेली नाही. आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे सुंदर जग पाहणार असतील तर आपले डोळे दान देऊन अंधांना डोळस करण्याची गरज आहे. ‘नेत्रदान श्रेष्ठ दान आहे’, आपल्या मृत्यूनंतर दान केलेल्या डोळ्यांमुळे अंधांच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो, ही संकल्पना समाजात रुजण्याची गरज आहे.