कुणी कार्यकारिणी देता का हो ?
By admin | Published: May 12, 2014 03:49 AM2014-05-12T03:49:53+5:302014-05-12T03:49:53+5:30
राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाला ठाणे महानगरासाठी गेले अनेक महिने कार्यकारिणीच नाही. त्यामुळे अरे कुणी कार्यकारिणी देता का कार्यकारिणी, असा टाहो फोडण्याची वेळ येथील भाजपा कार्यकर्त्यांवर आली आहे.
ठाणे भाजपाचा टाहो : विधानसभा निवडणुकांची व्यूहरचना सुरू
स्नेहा पावसकर ,ठाणे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्टÑवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस सर्वच पक्षांनी प्रत्येक स्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाला आणि तेसुद्धा विधानसभेचे सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरासाठी गेले अनेक महिने कार्यकारिणीच नाही. त्यामुळे अरे कुणी कार्यकारिणी देता का कार्यकारिणी, असा टाहो फोडण्याची वेळ येथील भाजपा कार्यकर्त्यांवर आली आहे. लोकसभेची रणधुमाळी शांत होत नाही तोच विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना सुरू झाली आहे. ठाणे शिवसेनेत पदोन्नतीचे प्रताप होत असताना भाजपाला ठाणे शहरासाठी कार्यकारिणी असणे महत्त्वाचे वाटत नाही. काही महिन्यांपूर्वी मिलिंद पाटणकर ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी नवी कार्यकारिणी तयार केली होती. मात्र, परिवहन समितीच्या निवडणंकीत झालेल्या बंडाळीला कारणीभूत ठरवून शिवसैनिकांसह भाजपेयींनीही पाटणकरांना लक्ष्य केले होते. त्यानंतर राम नाईक चौकशी समिती नेमली गेली तिने दिलेल्या अहवालानुसार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पाटणकरांच्या कार्यकारिणीला स्थगिती दिली. त्यामुळे जुनी बरखास्त आणि नवीन नियुक्त नाही, अशी अवस्था भाजपाची झाली़ त्यामुळे सध्या महानगर भाजपही आवळा-भोपळ्याची मोट ठरली आहे. याचा परिणाम माजी आमदार संजय केळकर हेच ठाणे भाजपचे सर्वेसर्वा झाल्याचे चित्र आहे. कार्यकारिणीविना लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या भाजपच्या हताश कार्यकर्त्यांत काहीसा प्राण फुंकण्यासाठी समन्वयकाची नियुक्ती केली होती. तीही प्रभावी ठरली नाही. पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चिंतामण वणगा यांच्या निवडणूक कार्यासाठी पक्षाने दिलेला भला मोठा निधी कोणी, कसा, किती गिळंकृत केला, यावरून घमासान माजले आहे. सध्या ठाणे महानगरात भाजपाची कोणतीही कार्यकारिणी नाही. मी नेमलेल्या कार्यकारिणीला श्रेष्ठींनी स्थगिती दिल्याने आता ठाणे भाजपाची अवस्था बिनपदाचे सर्वाधिकारी अशी झाली आहे, असे ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांनी सांगितले. पाटणकर यांनी बेकायदेशीररीत्या नेमलेल्या भाजपाच्या ठाणे शहर कार्यकारिणीला प्रदेश कार्यकारिणीनेच स्थगिती आणली. संदीप लेले, संजय केळकर, माधवी नाईक यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणीची पदे असून माझ्याकडे महापालिकेतील गटनेतेपद आहे. आमच्याबरोबरच प्रत्येक पदाधिकारी क्षमतेनुसार शहरात पक्षासाठी कार्य करत असल्याचे गटनेते संजय वाघुले म्हणाले.