‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 06:42 AM2024-10-14T06:42:29+5:302024-10-14T06:43:39+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्या म्हणण्याला दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मविआच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केली.
मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी वारंवार मागणी करणारे उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत घुमजाव करीत वेगळी भूमिका मांडली. महायुतीने आधी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मग आम्ही आमचा चेहरा जाहीर करतो, असे त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्या म्हणण्याला दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मविआच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केली.
कुणाचेही नाव जाहीर करा, पण मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, मी लगेच पाठिंबा देतो, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी अलिकडे जाहीरपणे केली. मात्र रविवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदावर तशी भूमिका घेण्याचे टाळले. महायुती गद्दारांच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार का? हे जाहीर करावे, असे उद्धव म्हणाले. या सरकारची गच्छंती हे आमचे प्रमुख ध्येय आहे, आमच्यासाठी मुख्यमंत्रिपदापेक्षा राज्याच्या जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका शरद पवार आणि पटोले यांनी व्यक्त केली.
‘गद्दारांचा पंचनामा’ पुस्तिकेचे प्रकाशन
राज्यातील महायुती सरकारच्या काळातील कारभाराची चीरफाड करणाऱ्या ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले. वांद्रे येथील हॅाटेल ताज लँडस एन्डमध्ये मविआच्या पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. - सविस्तर/७
महायुतीच्या काळात प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त
सरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण किती निर्णयांची अंमलबजावणी होईल? महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण या सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्धवस्त झाली, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्धवस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्राला वाचवावे लागेल आणि त्यासाठी मविआ प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.
मविआत नेतृत्वाचा प्रश्न नाही : शरद पवार
हरियाणाच्या निकालावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील जनता बदल करण्यासाठी उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही तसेच चित्र होते. विधानसभेलाही तसेच परिणाम येतील. मविआत नेतृत्वाचा प्रश्न नाही व खुर्चीसाठी वादही नाहीत, आमच्यात एकमत आहे. ही निवडणूक मविआ विरुद्ध महायुती अशी आहे. महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर पाहू, असे पवारांनी स्पष्ट केले.