मोर्चात अर्वाच्च घोषणा कोणी दिल्या? - तावडे
By admin | Published: October 6, 2016 05:50 AM2016-10-06T05:50:16+5:302016-10-06T05:50:16+5:30
औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यात अत्यंत अर्वाच्य भाषेत घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे या घोषणा खरेच शिक्षकांनी दिल्या की, शिक्षण संस्थाचालकांनी पाठविलेल्या
मुंबई : औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यात अत्यंत अर्वाच्य भाषेत घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे या घोषणा खरेच शिक्षकांनी दिल्या की, शिक्षण संस्थाचालकांनी पाठविलेल्या भाडोत्री गुंडांनी दिल्या? असा सवाल करत काही शिक्षक संघटनांनी उद्या गुरुवारी संपाची हाक दिली असून, या संपामध्ये शिक्षकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
औरंगाबादेतील घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शिक्षकांच्या मोर्च्यात विनाकरण पोलिसांनी लाठीमार केला असेल, तर ते नक्कीच निषेधार्ह आहे. सरकारने घोषित केलेल्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. तसेच, ज्या शासन निर्णयावर शिक्षक संघटनांचा आक्षेप आहे, त्या संघटनांशी चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांचे नुकसान होईल अशी कृती कोणाही करु नये, असे आवाहनही तावडे यांनी केले.
औरंगाबादच्या मोर्चात मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार सर्व मोर्चेकऱ्यांचे म्हणणे पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर या मंत्री द्वयांनी ऐकून घेतले. शिक्षकांनी आपल्याला भेटण्याचा कुठलाही निरोप पाठविला नव्हता. पोलिसांना शिक्षकांच्या मोर्च्यावर लाठीमार का करावा लागला याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
इयत्ता ९ आणि १० वी मधील निकालाची टक्केवारी सुधारण्यासाठी १०० टक्के अट ठेवण्यात आली आहे. शाळांची आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत. सामान्य जनतेचा पैसा खोट्या शिक्षण संस्थाचालकांनी लाटू नये यासाठी काही निकष कडक करण्यात आले आहेत. परंतु केवळ या निकालाच्या निकषांवर अनुदान अडविण्यात येणार नाही, असेही तावडे म्हणाले.