भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 06:19 AM2022-10-02T06:19:49+5:302022-10-02T06:21:43+5:30
भाजपविरोधात शिवसेनेतून नेमका आधी कोणी आवाज उठविला होता, यावरुन दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत.
विनायक राऊत, शिवसेना नेते
अशोक चव्हाण नक्की काय बोलले, हे मी ऐकलेले नाही. मात्र, एक नक्की २०१४ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले, त्याच्या काही महिन्यांनंतर भाजपच्या हुकूमशाहीबद्दल, त्रासाबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने बॉसिंग करायचे आणि शिवसेनेला दुय्यम लेखायचे, शिवसेनेच्या मंत्र्यांचे प्रस्ताव फेकून द्यायचे, याबाबत पहिला आवाज एकनाथ शिंदे यांनी उठवला होता. कल्याण-डोंबिवलीतील सभेत जाहीरपणे त्यांनी भाषण करून दडपशाहीच्या, हुकूमशाहीच्या राजवटीत मी मंत्री राहू शकत नाही, असे सांगत स्टेजवरच उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी प्रथम एकनाथ शिंदे यांनीच भाजपविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी भर सभेत फडणवीसांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देण्याची भाषा करणारे एकनाथ शिंदे आता त्यांची सोबत कशी काय करू शकतात, हे ईडीच सांगू शकेल. अशोक चव्हाण जे बोलले आहेत, त्याला यामुळे दुजोरा मिळतो आहे. आपल्याला भेटलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी चालत होती का?
भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट
खरे म्हणजे आम्हाला यातील काहीच माहीत नाही, त्यावेळी काय परिस्थिती असेल त्यानुसार माणसे धावपळ करत असतात. पण अशोक चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. अशोक चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटामुळे भाजप आणि शिंदे गटात कोणतेही अविश्वासाचे वातावरण तयार होणार नाही. अविश्वास असता तर आम्ही भाजपसोबत गेलोच नसतो. एकनाथ शिंदेंनी एकदा शब्द दिला म्हणजे दिला हे भाजपला माहीत आहे. जोपर्यंत आमची सोबत नव्हती तेव्हा ठीक आहे, पण आता सोबत दिली तर आम्ही त्यावर ठाम आहोत. एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात दि. ५ सप्टेंबरला याचे उत्तर देतील. तेव्हा ते सगळ्यांचा समाचार घेतील. ही २०१७ची बाब असल्याचे अशोक चव्हाण सांगतात आणि त्याबद्दल आता बोलतात. ज्या अशोक चव्हाण यांच्याबद्दल वेगळी चर्चा सुरू आहे, त्यांना आता काय उपरती आली माहीत नाही. चव्हाण बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी विधानसभेत आले नाहीत, बाहेर थांबले. एवढे ज्येष्ठ नेते त्यांना माहीत आहे मतदानाच्या वेळी वेळेवर विधानसभेचे दरवाजे बंद होतात. याचा अर्थ काय. त्यामुळे यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायचे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"