बाजारातील तेजीचा फायदा कुणाला?
By admin | Published: July 9, 2014 01:06 AM2014-07-09T01:06:47+5:302014-07-09T01:06:47+5:30
भारतातील शेअर बाजाराने घेतलेली उसळी कशाच्या जोरावर असा प्रश्न सर्व सामान्य गुंतवणूकदारांना पडलेला आहे.
Next
प्रसाद जोशी - नाशिक
वाढती महागाई, अर्थसंकल्पीय तुटीचा वाढता डोंगर, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराबाबतची अनिश्चितता अशा सर्व नकारात्मक बाबी एकत्र असतानाही भारतातील शेअर बाजाराने घेतलेली उसळी कशाच्या जोरावर असा प्रश्न सर्व सामान्य गुंतवणूकदारांना पडलेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार अधिकारावर आल्यापासून सातत्याने वाढणारा शेअर बाजार रेल्वे अर्थसंकल्पानंतर जोरात आपटला त्यामुळे बाजारातील ही तेजी नक्की कोणासाठी फायदेशीर असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या तीन सप्ताहांत मुंबई शेअर बाजारात सातत्याने तेजीचे वातावरण राहिले. परकीय वित्त संस्था तसेच देशांतर्गत परस्पर निधी यांनी मोठय़ा प्रमाणावर खरेदी केल्यामुळे बाजार वाढत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रातील सत्ता ग्रहण केल्यानंतर मोदी सरकारने पेट्रोल, डिङोल, रेल्वेची भाडेवाढ तसेच मालवाहतूक दरात वाढ केली.
यासर्व घटकांमुळे आधीच वाढलेली महागाई आणखी भडकली. याचा परिणाम आगामी आर्थिक आढाव्यात अर्थसंकल्पीय तूट वाढलेल्या स्वरूपात दिसणार आहे, हे सत्य नजरेआड करत बाजारात होत असलेली वाढ अनाकलनीय आहे.
इराकमध्ये सुरू झालेल्या यादवीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दरात अस्थिरतेचे वातावरण आहे. सध्या काही प्रमाणात दर कमी झाले असले तरी या दरांमध्ये केंव्हाही वाढ होऊ शकते. या वाढीचा भारताला मोठा फटका बसणार
असून त्यामुळे परकीय चलनाचा साठा काही प्रमाणात कमी होणार
आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची प्रकृती अद्यापही म्हणावी तशी सुधारलेली नाही. अशा सर्व नकारात्मक घटकांनी गर्दी केली असताना बाजार वाढणो तत्त्वत: असंभव असले तरी शेअरबाजाराने मात्र नवनवीन उच्चांक करण्याचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे बाजारातील ही वाढ कृत्रिम तर नाही ना, अशी शंका घेण्याला निश्चितच वाव आहे.
जुलै महिन्यात पहिले चार दिवस झालेल्या व्यवहारांचा आढावा घेतला असता परकीय वित्त संस्थांनी तीन दिवस मोठी खरेदी केली, तर एक दिवस विक्री केली. असे असले तरी या वित्तसंस्थांची खरेदी अधिक आहे. भारतीय परस्पर निधींनीही या चार दिवसांमध्ये 14 हजार 356 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. ही सर्व खरेदी अचानक का सुरू झाली, हा संशोधनाचा विषय आहे.
11 वर्षात कधीच झाली नाही अर्थसंकल्पपूर्व वाढ
4गेल्या दोन दशकांत अर्थसंकल्प पूर्व आठवडय़ामध्ये निर्देशांक सातत्याने घसरत असलेला दिसून आला आहे. मागील सप्ताहात शेअर बाजाराच्या निर्देशांकात झालेली तीन टक्के वाढ ही दोन दशकांतील सर्वाधिक वाढ होय.
41996-97 च्या अर्थसंकल्पापूर्वीच्या सप्ताहामध्ये बाजारात तेजी दिसून आली होती. त्यावेळी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर आले होते.
4गेल्या 11 वर्षामध्ये बाजारात अर्थसंकल्पपूर्व सप्ताहामध्ये सावधगिरीचे वातावरण दिसून आले आहे. याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्तित्वात असतानाही बाजाराने अशा प्रकारची वाढ दाखविली नव्हती, हे विशेष.