गेले विरोधी पक्षनेते कुणीकडे? काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनाही पडला प्रश्न
By अतुल कुलकर्णी | Published: March 30, 2019 01:22 AM2019-03-30T01:22:03+5:302019-03-30T01:22:22+5:30
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले काही दिवस अहमदनगर मतदारसंघ वगळता कुठेही दिसलेले नाहीत.
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील गेले काही दिवस अहमदनगर मतदारसंघ वगळता कुठेही दिसलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या दहा दिवसांवर आलेले असताना विरोधीपक्ष नेते हे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ गाठीभेठी घेत फिरत आहेत. सुजय हे भाजपाचे उमेदवार आहेत.
उद्या शनिवारी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत टिळक भवन येथे होत आहे. बैठकीला पक्षाचे प्रभारी मलिकार्जुन खरगे, अतिरिक्त प्रभारी मधुसूदन मिस्त्री, वेणूगोपाल यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, सरचिटणीस मुकूल वासनिक, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित राहाणार आहेत. विखे पाटील या बैठकीला तरी येणार आहेत का? याविषयी त्यांच्या कार्यालयातून कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दोन-तीन दिवसात ते पत्रकारांशी बोलणार असल्याचे त्यांचे प्रसिध्दी प्रमुख अभिजित देशमुख यांनी सांगितले.
उद्याच्या बैठकीत निवडणुकीची व्यूव्हरचना, कोणत्या नेत्याच्या सभा कोठे घ्यायच्या आदीचे नियोजन केले जाणार आहे. पक्षाच्या वॉररुमचेही औपचारिक उद्घाटन खरगे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वॉररुमचे प्रमुख माजी मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली. मात्र विखे यांच्याविषयी आपल्याला कल्पना नाही, असे ते म्हणाले.
दुसरीकडे विखे नगर जिल्ह्यात भाजपाने उमेदवारी नाकारलेले खा. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन आले. त्याआधी त्यांनी डॉ. सुजय यांच्यासाठी बैठका घेतल्या. आपल्याच पक्षाचे विरोधी पक्ष नेते भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत,
याकडे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी विखे असे करणार नाहीत, एवढेच उत्तर दिले.
विखे यांना पक्षाच्या कोणत्याही महत्वाच्या बैठकांना सहभागी करुन घेऊ नका, अशा सूचना स्वत: खरगे यांनी दिल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्यांच्यावर फार विसंबून राहू नका, तुम्ही तुमचे काम करत रहा, पक्ष योग्य वेळी योग्य तो निर्णय
घेईल, असेही सांगण्यात आल्याचे समजते.
पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेते विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय भाजपात गेले तर, उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. पुणे मतदारसंघातील उमेदवार अजून ठरलेला नाही. या सर्व घडामोडींची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.