बाळासाहेबांचा ‘तो’ ऐवज नेमका आहे तरी कोणाकडे? राज ठाकरे म्हणतात, यापूर्वीच दिलाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:08 AM2023-08-09T06:08:34+5:302023-08-09T06:09:01+5:30
अशी सुरू झाली राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा
- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे दोघे एकत्र येणार म्हणून दोन दिवस बातम्या सुरू आहेत. मात्र, त्यात कसलेही तथ्य नाही. हे दोघे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्याला कारण ठरले दोन हर्षल. ठाकरेंच्या शिवसेनेत हर्षल प्रधान, तर राज ठाकरे यांच्याकडे हर्षल देशपांडे नावाचे प्रसिद्धीप्रमुख आहेत. या दोघांच्या एकमेकांशी झालेल्या चर्चेनंतर या बातमीने वेग घेतला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सध्या सुरू आहे. १९६६ पासून बाळासाहेबांच्या भाषणांचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. सुरुवातीची काही भाषणे राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती होती. त्यामुळे हर्षल प्रधान यांनी हर्षल देशपांडे यांना फोन केला. बाळासाहेब ठाकरे यांची ऑडिओ भाषणे, फोटो, पुस्तकं मिळू शकतील का? स्मारकासाठी ती हवी आहेत, असे सांगितले. त्यावर हर्षल देशपांडे यांनी हे राज यांना सांगितले.
यासंदर्भात हर्षल प्रधान ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, तुम्हाला काय काय हवे आहे ते सांगा, म्हणजे मी काढून ठेवतो. तुम्ही येऊन पाहा, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे हर्षल देशपांडे यांचा निरोप आला. ही गोष्ट उद्धव यांना सांगितली तेव्हा त्यांनी, अशी सगळी माहिती असेल तर त्यांना काढू दे. आपण स्वत: जाऊन पाहू, असे सांगितल्याचेही प्रधान म्हणाले. अधिवेशन काळात उद्धव ठाकरे विधानभवनात आल्यावर त्यांनी ही गोष्ट काही पत्रकारांना सांगितली. त्यावर तुम्ही राज ठाकरेंकडे जाणार का, असा सवाल विचारला असता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कुठेही जायला तयार आहे, असे उत्तर उद्धव म्हणाले होते. सोमवारी टोलवरून आदित्य ठाकरेंनी आंदोलनाची भाषा केली. त्यावर मनसेनेही प्रतिक्रिया दिली. तेव्हाचा संदर्भ घेत काहींनी दोघे एकत्र येणार, अशा बातम्या सुरू केल्या.
ऐवज यापूर्वीच दिलाय
बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांची पुस्तके, सीडी, भाषणांच्या ऑडिओ असा सगळा ऐवज स्वत: राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडे दिला होता. त्यामुळे आता आपल्याकडे फार काही आहे, असे वाटत नाही. बघू, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिल्याचे मनसे प्रसिद्धीप्रमुख हर्षल देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.