भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 10:47 AM2023-06-11T10:47:05+5:302023-06-11T11:09:31+5:30
निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता.
निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता. याला आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवतो. आजही साडे अकरा कोटी जनतेचा ठाकरेंच्या शब्दावर विश्वास आहे. बाहेरच्यांवर नाही, असे राऊत म्हणाले.
भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? त्यांच्यासोबत त्यांच्याशी निष्ठावान असलेले अकाली दल, शिवसेना राहिलेले नाही. आता त्यांना २०२४ मध्ये कळेल, कोण होते म्हणून जिंकले होते. वाघाचे कातडे घालून कोल्हे-लांडगे फिरत आहेत. खरा वाघ समोर आला की त्यांची काय अवस्था होईल हे दिसेल, असे राऊत म्हणाले.
धोका कोणी दिला, का दिला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे सरकार आहे. तुम्हीच काही वर्षांपूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले नव्हते ना, आता त्याच शिवसेनेच्या फुटलेल्या गटाला मुख्यमंत्री करून मिरवताय. आम्हाला धोका दिला त्याची कबुलीच तुम्ही देताय, अशी टीका राऊत यांनी शहा यांच्या आरोपांवर केली.
राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. काल त्यांचा वर्धापन दिन झाला. यावेळी शरद पवारांनी पुर्नमांडणी केली. असे बदल होत असतात काळानुसार बदल करावे लागतात. तुम्ही त्याला भाकरी फिरविली असे म्हणू शकता. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला असेल. अजित पवार हे राज्यातील नेते आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील स्थान कायम आहे असे मला वाटते. सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्याध्यक्ष झाल्यात याचा आनंद आहे, असे राऊत म्हणाले.
अमित शहांनी देशाची कायदा सुव्यवस्था यावर बोलावे. गुजरातचे लोहपुरुष आहेत ना मग मणिपूरची हिंसा का नाही रोखता आली. तिथे आज काय चालू आहे, असा सवाल राऊत यांनी केला.