सचिन वाझेला नोकरीत कोणी घेतलं?; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी थेट नाव सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:11 PM2023-04-14T16:11:51+5:302023-04-14T16:12:52+5:30
वाझेला नोकरीत घेतल्यानंतर माझ्या कानावर काही तक्रारी आल्या. मी आयुक्त परमजीत सिंह यांना बोलावलं असं अनिल देशमुख म्हणाले.
मुंबई - १०० कोटी वसुली प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील प्रमुख आरोपी सचिन वाझे सध्या जेलमध्ये आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी वापरण्यात आलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे याचे नाव प्रामुख्याने पुढे आले. त्यानंतर या वाझेने गृहमंत्र्यांवरच १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. सचिन वाझेला पोलीस नोकरी कुणी घेतले असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यावर माजी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सचिन वाझे हा फौजदार होतो. त्याला सरकारी नोकरीत घेण्याचा अधिकार आयुक्त पातळीवरचा होता. प्रत्येकाला अधिकार वाटून दिलेले असतात. एसीपीच्या खालच्या दर्जाचे अधिकारी शासकीय नोकरीत घेण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना असतात. महाराष्ट्रात साडेसात हजार फौजदार आहेत. आयुक्तांनी कुणाला नोकरीत घेतले याची गृहमंत्र्यांना माहिती नसते असं त्यांनी सांगितले.
पण वाझेला नोकरीत घेतल्यानंतर माझ्या कानावर काही तक्रारी आल्या. मी आयुक्त परमजीत सिंह यांना बोलावलं. सचिन वाझेला ज्याच्याबाबत तक्रारी आहेत त्याला नोकरीत घेतले असं ऐकले त्याबाबत विचारणा केली. तेव्हा आयुक्तांनी म्हटलं, मी त्यांना २५-३० वर्षापासून ओळखतोय. त्यांच्याबद्दल ज्या तक्रारी आहेत त्या खोट्या आहेत. मला त्याची मदत होईल असंही त्यांनी सांगितले होते असंही माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. मुंबई तकने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, एखाद्याचा खून झाला तर सरकारला लगेच हे कुणी केले माहिती पडत नाही. जेव्हा ४-५ दिवस तपास होतो त्यातून माहिती समोर येते. तेव्हा अ, ब किंवा क ने खून केला कळते. जेव्हा मनसुन हिरेनची हत्या झाली त्याचदिवशी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एखादा खून झाला त्याबाबत १ तासांत लगेच गृहमंत्री सांगू शकत नाही त्याचा खून कुणी केला? या गोष्टीचा तपास सुरू झाला, ४-५ दिवस चौकशी झाली. त्यानंतर हे पुढे आले. तेव्हा आम्ही सचिन वाझेवर कारवाई केली. चौकशीनंतरच कारवाई केली असा खुलासाही अनिल देशमुख यांनी केला.