परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 06:52 AM2024-12-12T06:52:30+5:302024-12-12T06:52:44+5:30
Parabhani Violence: परभणीत घडलेली घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तत्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र, ते न झाल्यामुळे परिसरातील परिस्थिती चिघळली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संविधान प्रास्ताविकेच्या विटंबनेनंतर परभणीतील वातावरण बिघडले असतानाच यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी सत्ताधारी, तसेच विरोधकांनीही केली आहे. संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणारा आरोपी पकडला गेला आहे. मात्र, त्याच्या मागे कोण आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत याप्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. आंबेडकरी अनुयायांनी शांतता राखावी, असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
परभणीत घडलेली घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तत्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र, ते न झाल्यामुळे परिसरातील परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच, सरकारने जनतेला आश्वासित करावे की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, अशी मागणी करत संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
‘...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील’
nपरभणीत समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील भारतीय संविधानाची केलेली तोडफोड अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे.
nपुढील २४ तासांत आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.
nआतापर्यंत केवळ एका समाजकंटकाला अटक केली आहे, मी सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो, असे आंबेडकर यांनी समाजमाध्यमावर आपली भूमिका मांडताना म्हटले आहे.