भगीरथ बियाणी कोण आहे?: ज्यांच्या मृत्यूवरून जितेंद्र आव्हाडांनी केला गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:07 PM2023-12-01T16:07:33+5:302023-12-01T16:09:34+5:30
बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा आव्हाडांनी दिला.
ठाणे - कर्जत येथील चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांनी भगीरथ बियाणी यांच्या नावाचा उल्लेख केला. भगीरथ बियाणीनं आत्महत्या का केली? कुणामुळे केली? २००२ पासून बीडमध्ये जी खुनाची मालिका सुरू झाली त्यामागे कोण असा थेट सवाल आव्हाडांनी उपस्थित केल्यानं अनेक चर्चांना उधाण आले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती, मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळलं, त्यामुळे भगीरथ बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
कोण आहे भगीरथ बियाणी?
११ ऑक्टोबर २०२२ रोजी बीडमधील भाजपा पदाधिकारी भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. स्वत:जवळील बंदुकीने बियाणी यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आत्महत्येच्या आदल्या रात्री बियाणींनी आपल्या कुटूंबासमवेत उशिरापर्यंत गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघउला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
बियाणी यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.बियाणी यांच्याकडून पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला. भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूस्थळी सुसाईट नोटही लिहिल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मात्र जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या दाव्यामुळे आज पुन्हा ही घटना चर्चेत आली आहे.