डॉ. अनाहिता पंडोल आहेत तरी कोण? पारशी समाजासाठी मोठे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 02:42 PM2022-09-06T14:42:02+5:302022-09-06T14:42:49+5:30
डॉ. पंडोल यांनी २००४ मध्ये बॉम्बे पारसी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द बॉम्बे पारसी पंचायत फर्टिलिटी प्रोजेक्ट’ची सुरुवात केली होती.
मुंबई :सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ते प्रवास करत असलेल्या कारच्या चालक डॉ. अनाहिता पंडोल आहेत कोण, असा प्रश्न चर्चेत आला आहेत. डॉ. पंडोल या नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ असून आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलिटी) या विषयात त्यांचे मुख्य काम आहे. वंध्यत्व असलेल्या जोडप्यांवर त्या उपचार करतात. त्या मुंबईतील विविध रुग्णालयात कार्यरत असून, केंद्र सरकारच्या ‘जियो पारसी’ या उपक्रमासाठी त्या वैद्यकीय दृष्टीने संबंधित टीमला मार्गदर्शन करत असतात.
केंद्र सरकारची ही योजना सुरू होण्यापूर्वी डॉ. पंडोल यांनी २००४ मध्ये बॉम्बे पारसी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द बॉम्बे पारसी पंचायत फर्टिलिटी प्रोजेक्ट’ची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत त्या स्वस्त दरात आयव्हीएफचे उपचार करत असून, चांगल्या सुविधा असलेल्या रुग्णालयात त्या वंध्यत्व असलेल्या जोडप्यांवर उपचार देत होत्या. त्या परझोर फाउंडेशन या संस्थेसोबत गेली अनेक वर्षे त्या संलग्न आहेत. जियो पारसी ही केंद्राची योजना तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
सध्या त्या जसलोक रुग्णालय, ब्रीच कॅण्डी रुग्णालय, मसिना रुग्णालय आणि बी. डी. पेटिट पारसी सामान्य रुग्णालयात कार्यरत आहेत. फेडरेशन ऑफ गायनाकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या भारतातील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटेनच्या माजी अध्यक्ष डॉ. रिशमा धिल्लोन- पै यांनी याबाबत सांगितले की, डॉ. अनाहिता आणि मी गेली अनेक वर्षे जसलोक रुग्णालयात काम करत आहोत.
त्या कमालीच्या शिस्तीच्या डॉक्टर आहेत. त्या कुणाच्याही कामात कधी ढवळाढवळ करत नाही. त्या खूप मेहनती आणि कष्टाळू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशीच आम्ही सगळे सहकारी प्रार्थना करत आहोत.
संपूर्ण देशात पारशी समाजाची लोकसंख्या वेगाने कमी होत असल्याने केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने २४ सप्टेंबर २०१३ साली ‘जियो पारसी’ योजना चालू केली होती. गेल्या नऊ वर्षांत या योजनेअंतर्गत ३८६ पेक्षा अधिक बालकांचा जन्म झाला आहे. या योजनेअंतर्गत पारशी जोडप्यांना आयव्हीएफ उपचारासाठी अर्थसहाय्य केले जाते. डॉ. पंडोल या योजनेच्या संस्थापक सदस्य आहेत.