"मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:48 PM2024-07-02T13:48:48+5:302024-07-02T14:16:06+5:30
Maharashtra Assembly Session 2024: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मुंबई - अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने अधिकचे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधासभेत केली.
अंतरवली सराटी या गावावर ड्रोनने टेहळणी केल्याचे वृत्त आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे. टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे. अंतरवाली सराटीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी पोलीसांकडून अहवाल घेणार असल्याचे सांगितले.