व्हिप कोणाचा? अध्यक्ष कोण?; विधानसभेत शिवसेनेचे शिंदे-ठाकरे गट येणार आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 07:22 AM2022-07-03T07:22:46+5:302022-07-03T07:23:28+5:30
भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मविआचे राजन साळवी
मुंबई : विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड ही रविवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात होणार असून, शिवसेनेतील दोन्ही गटांनी पक्षाच्या आमदारांसाठी व्हिप जारी केल्याने तणावाची स्थिती आहे. व्हिप कोणाचा चालणार, अध्यक्ष कोण होणार, भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर की महाविकास आघाडीचे राजन साळवी याचा फैसला होणार आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांचा गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या आमदारांसाठी व्हिप जारी केले आहेत. शिंदे यांच्यासोबत ३९ तर ठाकरे गटात १६ आमदार आहेत. शिंदे गटातर्फे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना मतदानाचा व्हिप काढला तर ठाकरे गटातर्फे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला. राष्ट्रवादी व काँग्रेसने साळवी यांना, तर भाजपने नार्वेकर यांना मत देण्याचा व्हिप काढला आहे.
खुल्या पद्धतीने मतदान होणार
या निवडणुकीत खुले मतदान करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. नियमानुसार आधी आलेला प्रस्ताव मतदानाला टाकला जाईल. आधी नार्वेकर यांचा अर्ज आलेला होता. त्यामुळे त्यांच्या नावाचा प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ पुकारतील. त्यावर आधी आवाजी मतदान होईल. त्यावर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेतला गेला तर नार्वेकर यांच्या बाजूने किती आमदार आणि विरोधात किती आमदार याची शिरगणती केली जाईल. लोकसभा वा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कोणत्याही पक्षाने जारी केलेला व्हिप मानला नाही म्हणून सदस्याला अपात्र ठरविले जाणार नाही. कारण, व्हिपच्या दबावात सदस्यांना त्यांच्या पसंतीनुसार मतदानापासून रोखणे हे त्या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही, असे तत्त्व स्वीकारले आहे. त्याचा आधार घेत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत शिंदे गटाचे सदस्य नार्वेकर यांना मतदान करतील.
...तर महाविकास आघाडी न्यायालयात जाईल
शिंदे गटाने अध्यक्षपद निवडणुकीत नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले तर आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा करीत ठाकरे गट न्यायालयात जाईल. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा विषयही विचारार्थ घ्यावा, अशी मागणी केली जाईल, अशी शक्यता आहे.
दावे आणि प्रतिदावे
संख्याबळ आमच्या बाजूने आहे, व्हिप महत्त्वाचा आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. निवडणुकीवरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले होते. काँग्रेसने संग्राम थोपटे यांचा अर्ज भरण्याची तयारी केली होती. तथापि, नंतर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसले व राजन साळवी यांच्या नावावर एकमत झाले. साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे शिवसेना आमदार आहेत.