भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार

By यदू जोशी | Published: October 1, 2024 09:02 AM2024-10-01T09:02:04+5:302024-10-01T09:02:18+5:30

: महायुतीत १६० जागा लढण्याचे स्पष्ट संकेत

Who is the BJP candidate? Party officials will give names in the envelope | भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार

भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार

- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील १६० विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार कोण असावेत? यासाठीच प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्ष पदाधिकाऱ्यांना एकेक लिफाफा दिला जाईल. प्रत्येक जण तीन पर्याय पसंतीक्रमानुसार लिहून त्या लिफाफ्यात चिठ्ठी टाकेल. उद्या आणि २ ऑक्टोबरला ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उमेदवार निश्चितीसाठी हे लिफाफे महत्त्वाचे ठरणार आहेत.

उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा हा प्रयोग भाजप करणार आहे. तो अमलात कसा आणायचा यासाठी गेल्या चार दिवसांत संपूर्ण राज्यासाठी एक आणि प्रत्येक विभागासाठी एक अशा बैठका केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे भाजप विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव यांनी घेतल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. बंद लिफाफ्यातून कुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार याकडे आता लक्ष असेल.  

अशी असेल प्रक्रिया... 
१६० मतदारसंघांमध्ये १६० पक्षनिरीक्षक जातील. जिल्हाध्यक्षांकडून विधानसभा संपर्कप्रमुखांकडे दिलेले लिफाफे हे निरीक्षक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख ८० ते १०० पक्ष पदाधिकाऱ्यांच्या हाती देतील. तुम्हाला भाजपचा आमदार कोण हवाय ते तीन पसंतीक्रम चिठ्ठीवर लिहा व लिफाफ्यात टाका, असे त्यांना सांगितले जाईल.

यांची मते लिफाफ्यात घेणार
प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह निमंत्रित व विशेष निमंत्रित, प्रदेश मोर्चांचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्ह्याच्या विविध मोर्चांचे अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, मंडळांच्या सेलचे संयोजक, जि.प., पं.स. नगरपरिषद सदस्य, आजी-माजी आमदार-खासदार, कृउबाचे संचालक, तालुका सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष.

मित्रपक्षांना १२८ जागा?
१६० मतदारसंघांमध्ये भाजपचे निरीक्षक जाणार असल्याने पक्ष महायुतीत १६० जागा लढणार असे मानले जात आहे. याचा अर्थ शिंदेसेना व अजित पवार गटाला मिळून १२८ जागा मिळतील असे दिसते. भाजपने १६० मतदारसंघांची नावेही निश्चित केली असल्याचा तर्कही
या निमित्ताने दिलाजात आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची नावे १ ऑक्टोबरला सीलबंद केली जातील. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नावे ही २ ऑक्टोबरला सीलबंद करण्यात येतील.

निरीक्षकाने गडबड केल्यास होणार कठोर कारवाई 
लिफाफे चार पदाधिकाऱ्यांसमोर सीलबंद केले जातील. ते दोन-तीन दिवसांत मुंबईत प्रदेश भाजप कार्यालयात जमा केले जातील आणि मग भूपेंद्र यादव, बावनकुळे ते उघडतील, त्यातील नावे बघतील.
उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी या चिठ्ठ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असे राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित राहिलेल्या भाजपच्या एका नेत्याने सांगितले. ८० ते १०० प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून चिठ्ठ्या घेणे, त्या लिफाफाबंद करून प्रदेश कार्यालयात पोहोचविणे यात कोणत्याही निरीक्षकाने कोणतीही गडबड केली तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
उमेदवार ठरविताना पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्याची मते जाणून घेण्यात येणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये ही पद्धत उपयोगात आणली गेली होती आणि त्याचा मोठा फायदा झाल्याचा निष्कर्ष समोर आला होता.
विविध सर्वेक्षणांमधून समोर आलेली नावे, संघ परिवाराने सुचविलेली नावे आणि आता पक्ष पदाधिकाऱ्यांकडून येणारी नावे यांच्यात जे नाव प्रकर्षाने समोर येईल, त्याला उमेदवारीची अधिक संधी असेल, असे सूत्रांनी सांगितले.   

Web Title: Who is the BJP candidate? Party officials will give names in the envelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.