विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 17:43 IST2024-06-20T16:43:37+5:302024-06-20T17:43:41+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते.

विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने दिल्लीतील भाजपश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे. या पराभवानंतर भाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा बसलेला फटका आदी विषयांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करताच निवडणूक लढविण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते. परंतू लोकसभा निवडणुकीत भाजपा ९ जागांवर आली आणि सगळा पेच फसला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकारी पक्ष याचा निर्णय घेतील असे ते म्हणाले. परंतू विना चेहराच भाजपा निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार महाराष्ट्र भाजपाची नियमित कोअर कमिटी किंवा राज्य संसदीय बैठक का घेतली जात नाही, असा प्रश्न राज्यातून बैठकीला गेलेल्या नेत्यांना विचारण्यात आला. तसेच यानंतर कोणीही एकट्याने निर्णय घेताना दिसू नये, अशी ताकीदही देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला मागे टाकले आहे. विधानसभेत भाजपाचे 100 पेक्षा जास्त आमदार असूनही लोकसभेला ९ जागा आल्या आहेत. तर काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह १४ खासदार आहेत. यामुळे तीन महिन्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही हा फटका बसू नये म्हणून फडणवीसांना मुख्यंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे ठेवण्याची शक्यता कमी झाली आहे.